Pune News : पुण्यातील कोथरुडमधील भाजपचा वाद मिटला? शहराध्यक्षांनी दिली मेधा कुलकर्णींच्या नाराजीबाबत महत्त्वाची माहिती....
पुण्यातील भाजपमध्ये सगळं आलबेल असल्याचं धीरज घाटे यांनी म्हटलं आहे. काही नाराजी असेल तर ती दूर करुन एकत्र काम करणार असल्याचंदेखील ते म्हणाले.
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणावरुन (Medha kulkarni) कोथरुड परिसरातील भाजप नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. मात्र हा वाद किंवा गैरसमज सामंजस्याने सोडवणार आणि भाजपमधील प्रत्येक नेत्याला आदर मिळणार असल्याचं पुण्याचे भाजपचे नवे शहराध्यक्ष धीरज घाटे (dhiraj ghate) यांनी एबीपी माझाशी बोलताना संगितलं आहे.
पुण्यातील भाजप एकत्रच आहे. मात्र अनेकदा काही कारणामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरते. यंदा लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यांचा फोटो लावण्यात आला नव्हता आणि त्यांना रितसर निमंत्रणही देण्यात आलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र यापुढे भाजपच्या शहरातील कोणत्याच वरिष्ठ नेत्याला किंवा कार्यकर्त्याला डावललण्यात येणार नाही. पक्षात प्रत्येकाला योग्य मान दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
चांदणी चौकाच्या पुलावरुन पुण्यातील भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पहायला मिळाली. त्यावेळी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांना कार्यक्रमाच्या तयारीत डावलण्यात आल्याचा आरोप केला होता. कोथरुडमधील नेते अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्या कार्यक्रमानंतर खुद्द नितिन गडकरी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळीदेखील त्या नाराज असल्याचं बघायला मिळालं. मात्र यात आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष दिल्याचं दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामंजस्याने काम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र पुण्यातील कोथरुडचे नेते मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या आरोपावर अजूनही मौन पाळलं आहे. त्यांनी माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे.
पुनित जोशींनी आरोप फेटाळले...
मेधा कुलकर्णी पक्षाची शिस्त मोडत असल्याची चर्चा कोथरुडमधील कार्यकर्त्यांमध्ये सुरु असून भाजप कोथरुड अध्यक्ष पुनीत जोशी यांनी व्हिडीओ पोस्ट करुन मेधा कुलकर्णींचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पुणेकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन देशाचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्ट रोजी पार पडले. पण या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल माजी आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. साधे हँड बिलवर फोटो नाही हा त्यांचा आक्षेप होता. पण याच वेळी शहरात 240 हॉर्डिंग्सवर यांचे फोटो होते, वृत्तपत्रातील जाहिरातीत यांचे फोटो होते. साधारण नाराजी असेल तर ती अशी जाहीर व्यक्त करायची नसते, ही पक्षाने आम्हाला दिलेली शिकवण आहे, अशा शब्दांत त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आता त्यानंतर धीरज घाटे यांनी या प्रकरणार लक्ष घालून येत्या काळात कोणीही नाराज राहणार नाही असं काम करु, असं घाटे यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-