(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवासी भिडले, पासधारक आणि सामान्य प्रवासी यांच्यात हाणामारी
Pune News : सिंहगड एक्स्प्रेसमधून नेहमी गुण्यागोविंदाने पुणे-मुंबई असा रेल्वे प्रवास करणारे चाकरमानी एकमेकांमध्ये भिडले. निमित्त होते जागा पकडण्याचं.
Pune News : मुंबई लोकल ट्रेनमधील (Local Train) हाणामारी ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. रोज कुठेना कुठे अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. सीटवर बसण्याचं कारण तर नित्याचंच. असाच प्रवाशांमधील हाणामारीचा प्रकार पुण्यात घडला. नेहमी गुण्यागोविंदाने पुणे-मुंबई असा रेल्वे प्रवास करणारे चाकरमानी बुधवारी (12 ऑक्टोबर) एकमेकांमध्ये भिडले. निमित्त होते जागा पकडण्याचं. सिंहगड एक्स्प्रेसच्या (Sinhgad Express) बोगीत चाकरमानी यांच्यात जागेच्या मुद्द्यावरुन हाणामारी (Fight) बघायला मिळाली.
वादाचं कारण काय?
सिंहगड एक्स्प्रेसमध्ये पासधारक आणि सामान्य प्रवासी असा हा वाद पेटला. मुंबई-पुणेदरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस बुधवारी (12 ऑक्टोबर) सकाळी चिंचवड स्टेशनवर येताच रेल्वेच्या बोगीत प्रवासी घुसले अन् जागा पकडण्यासाठी झुंबड उडाली. पासधारक प्रवासी आणि सामान्य प्रवासी यांच्यामध्ये जागा पकडण्यावरुन वाद सुरु झाला. हा वाद पुढे इतका वाढला की प्रवाशांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी सुरु झाली. अगदी काही प्रवासी डब्यात खाली पडेपर्यंत ही हाणामारी झाली. डब्यात उपस्थित इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला.
पिंपरी आणि चिंचवडसाठी स्वतंत्र बोगीची मागणीने पुन्हा जोर धरला
या वादानंतर आता पुन्हा एकदा पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगळ्या बोगीची मागणी होताना दिसत आहे. याआधी देखील अनेक वेळा पिंपरी-चिंचवड रेल प्रवासी संघटनेने स्वतंत्र बोगीसाठी रेल्वे प्रशासनाला निवेदनं दिली आहे. पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगळी बोगी करावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र प्रवासी संघटनेच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यातच आता आणखी एक घटना समोर आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Mumbai Pune Sinhagad Express : मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी
ठाणे-पनवेल मार्गावरी लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी
गेल्या आठवड्यात ठाणे ते पनवेल मार्गावर एका लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीत एक महिला शिपाई जबर जखमी झाली होती. ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरुन महिलांमध्ये हाणामारी झाली होती. एक महिला आपल्या नातीसोबत ठाण्याहून पनवेल लोकलमध्ये बसली, तेव्हा कोपरखैराणे स्थानकावरुन एक महिला बसली होती. तुर्भे स्थानक आल्यावर एक महिला खाली उतरली आणि एक सीट रिकामी झाली. तेव्हा ही महिला आपल्या नातीसोबत त्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा त्या दुसर्या महिलेनेही त्या सीटवर बसण्याचा प्रयत्न केला. यावरुन दोघींमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर दोघींमध्ये जबर मारहाण झाली. यात रेल्वे पोलीस महिला कर्मचारी मध्ये पडली तेव्हा तिलाही जबर मारहाण करण्यात आली होती.
संबंधित बातमी
मुंबई लोकलमध्ये महिलांची डोकी फुटेस्तोवर फ्री स्टाईल हाणामारी; महिला पोलिसालाही मारहाण! Video Viral