(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule : जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा न देता लढलं पाहिजे; सुप्रिया सुळेंचा आव्हाडांना पाठिंबा
जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, मुंब्राच्या लोकांनी आव्हाडांना निवडून दिलं आहे. त्यामुळे काहीही झालं तरी त्यांनी राजीनामा देऊ नये, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
Supriya Sule: जितेंद्र आव्हाडांनी (jitendra Awhad) राजीनामा देऊ नये, मुंब्राच्या लोकांनी आव्हाडांना निवडून दिलं आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे, त्यामुळे काहीही झालं तरी त्यांनी राजीनामा देऊ नये, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya sule) केलं आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जयंत पाटील आणि अजित पवारदेखील त्यांच्याशी बोलले आहेत. त्यामुळे त्यांनी या सगळ्या परिस्थितीत लढलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत वाईट वाटून घेता कामा नये, अशी विनंती आम्ही सगळ्यांनी आव्हाडांना केली असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जितेंद्र आव्हाडांचा व्हिडीओ मी चार-पाच वेळा बघितला आहे. त्यात आव्हाड त्या महिलेला गर्दीत कशाला आलीस, घरी जा? असं म्हणाताना दिसत आहे. त्यावरुन आता राजकारण पेटताना दिसत आहे. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे, याचं दुर्देवं आहे. मुख्यमंत्री, स्थानिक खासदार, पोलिसांची यंत्रणा आजुबाजूला आहे. मुख्यमंत्री त्याच ठिकाणी असताना त्यांच्यावर आरोप केले जातात. हे प्रचंड वेदनादायी आहे."
महिला आम्ही राजकारणात येतो त्यावेळी आम्हाला महिला म्हणून वेगळी वागणूक मिळावी अशी आमची अपेक्षा नसते. अशा खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या की जेव्हा खरंच एखाद्या महिलेला गरज असते तेव्हा तिच्या मदतीला कोणी येत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. आपण राजकारण करत असताना स्वत:वर आणि आपल्या बोलण्यावर ताबा ठेवला पाहिजे, अशी माझी प्रत्येक राजकारण्यांना विनंती आहे. कायदा हे दडपशाहीचं नाही तर न्यायाचं साधन बनलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत काहीही प्रतिक्रिया न देणं मला योग्य वाटतं. ज्या पुरोगामी महाराष्ट्रात मी राहते, पुण्यातून अंधश्रद्धेचा लढा सुरु झाला, त्याच जादुटोण्यांवर बोलणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या लोकांबद्दल फार न बोललेलं कधीही योग्य ठरेल.
महाराष्ट्र राज्याची सध्याची स्थिती पाहता राष्ट्रपती राजवट हा पर्याय असू शकतो, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातील अनेक नेते निवडणुकाबद्दल बोलत आहेत. त्यांचं म्हणणं असेल तर निवडणुका लावा, असंही त्या म्हणाल्या. आम्ही खोके खोके करतो असा त्यांचा आरोप असतो, मात्र विरोधकच म्हणत आहेत की आम्ही 50 खोके नाही तर 200 खोके देणारे आहोत. आम्ही 200 ऐवजी 50 खोके बोललो त्यामुळे त्यांचा अपमान झाला आहे का?, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.