(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द : उदय सामंत
पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हलवण्याच्या निर्णय विद्यापीठाकडून अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
पुणे : रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता. काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पत्रकारीतेचा कोर्स हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र फक्त स्थगितीवर समाधानी न राहता माजी विद्यार्थ्यांकडून हा निर्णय रद्द करण्याची मागणी होत होती. आज विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव यांची उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर विद्यापीठाकडून हा निर्णय रद्द करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले,रानडे इन्स्टिट्यूटची जागा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे भाडेतत्त्वावर आहे. ही जागा विद्यापीठाच्या नावावर, विद्यापीठाच्या मालकीची होण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच रानडे इन्स्टिट्यूटच्या टेक्निकल अपग्रेडेशनसाठी स्टुडिओ आणि इतर सुविधांसाठी देखील कुलगुरुंसोबत चर्चा झाली. त्यासाठी शेजारच्या इमारतीत सोय करता येईल
रानडे इन्स्टिट्यूटमधे काळानुरूप जे बदल करायचे आहेत यासाठी उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमधे अहवाल देईल. त्यानंतर रानडे इन्स्टिट्यूटसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्या जातील, असे देखील उदय सामंत या वेळी म्हणाले.
नितीन गडकरींच्या पत्राचे उत्तर मुख्यमंत्री देतील
महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अनेक कामं सुरु आहेत. मात्र या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. या विषयी विचारले असता उदय सामंत म्हणाले, त्या पत्राचं उत्तर मुख्यमंत्री देतील. मी रानडे इन्स्टिट्यूटबद्दल बोलेल.
उदय सामंत यांच्या घोषणेनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील परिपत्रक काढून निर्णय रद्द झाल्याची घोषणा केली. त्यामुळे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर तसेच विद्यार्थ्यांकडून सेव्ह रानडे इन्स्टिट्यूट ही मोहिम राबवण्यात आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :