(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : स्वत:च्या घरासाठी 70 वर्षांच्या दाम्पत्यांनी उपोषण केलं अन् अखेर हक्काचं घर परत मिळवलं, नेमकं काय आहे प्रकरण?
भाडेकरुंना त्रासून 70 वर्षीय दाम्पत्याने स्वत:च्या घरासाठी उपोषण केलं होतं. त्यानंतर अखेर त्यांना त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा मिळाला आहे.
Pune News : काही दिवसांपूर्वी पुण्यातील वृद्ध दाम्पत्याने उपोषण केलं होतं. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या लढ्यात सहभाग घेतला होता. भाडेकरूच्या मुजोरीला कंटाळून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या वृद्ध दाम्पत्याने गेल्या महिन्यात गांधीवादी मार्गाने लाक्षणिक उपोषण आंदोलन करत 'भाडेकरू, आम्हाला आमचं घर देता का घर?' अशी आर्त हाक दिली होती. आंदोलनाची माध्यमांनी आणि सामाजिक कार्यकर्ते वसंत मोरे यांनी दखल घेत मध्यस्थी केली. आमदार नितेश राणे आणि आमदार दिलीप मोहिते यांनीही फोनवरून संवाद साधला. या सगळ्यांच्या प्रयत्नानंतर या वृद्ध फाटक दाम्पत्याला आपल्या स्वतःच्या घराचा कायदेशीर ताबा मिळाला आहे.
वयाच्या सत्तराव्या वर्षी स्वत:च्या घरासाठी लढा...
बिबवेवाडीतील आपल्याच घरासमोर बसून उपोषण करण्याची वेळ सत्तरीतल्या डॉ. अविनाश फाटक व माधुरी फाटक या वृद्ध दांपत्यावर आली होती. फाटक दाम्पत्याने सदानंद सोसायटीतील आपला 'सरस्वती' हा बंगला आतिश जाधव यांना पाच वर्षांच्या भाडेकरारावर 'किडझी' हे नर्सरी स्कुल चालवण्यासाठी दिला होता. मात्र, गेल्या साडेतीन वर्षांपासून जाधव यांनी भाडे न देता फाटक दाम्पत्यास वेठीस धरले होते. याबाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यावर निर्णय होत नसल्याने त्यांची ससेहोलपट सुरु होती.
या सगळ्या त्रासाला कंटाळून फाटक दाम्पत्याने गेल्या महिन्यात उपोषण केले. एका भाडेकरूच्या विरोधात घरमालकाने आंदोलन करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी मध्यस्थी करत अतिश जाधव यांच्याकडून बंगल्याचा ताबा फाटक दाम्पत्याला दिला.
हक्काचं घर मिळालं...
आमच्या या लढ्याला माध्यमांनी आणि मोरे यांनी, तसेच आमची मुलगी सुप्रिया आणि जावई डॉ. असित अरगडे यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज आम्हाला स्वतःच्या घरात राहण्याची संधी मिळाली आहे. गेल्या तीन-चार वर्षात झालेला सगळा त्रास विसरून आम्ही आनंदाने आमच्या घरात आलो आहोत. शेजारील लोक आणि असंख्य हितचिंतकांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही दोघेही सर्वांचे आभार आणि ऋण व्यक्त करतो, असं अविनाथ फाटक म्हणाले.
वसंत मोरे पुन्हा चर्चेत
शहरात कोणाला कोणतीही मदत करायला मनसेचे नेते वसंत मोरे कायम तत्पर असतात. गुन्हेगारी, अत्याचार किंवा कोणताही प्रश्न असला तरीही नागरिकांच्या सेवेसाठी ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते सगळ प्रकार बाहेर काढतात. या प्रकरणातदेखील त्यांनी लक्ष घातलं होतं. अखेर या दाम्पत्यांना त्याचं हक्काचं घर परत मिळालं.
ही बातमी वाचा: