Daund Dog : पिसाळलेला कुत्रा चावत सुटला; दौंडमध्ये 22 जण जखमी
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 20 ते 22 जणांना चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिक जखमी झाले आहेत.
Daund Dog : पुणे जिल्ह्यातील (pune) दौंडमध्ये (daund) पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 20 ते 22 जणांना चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिक जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून हा पिसाळलेला कुत्रा दौंड परिसरात फिरत होता. त्यावेळी रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या 20 ते 22 जणांना चावा घेतला. या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जखमींमध्ये अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. दौंड मधील एसआरपी कॅम्पमध्ये म्हसोबाची यात्रा सुरु असून त्या यात्रेमध्ये पिसाळलेल्या कुत्रा शिरल्याने अनेकांना चावा घेतला आहे. त्यामुळे दौंड नगरपालिकेकडून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरु आहे. कुत्रा चावल्याने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दौंडच्या रुग्णलयात म्हसोबा यात्रेतून पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेलले रुग्ण आले होते. कुत्र्याने चावा घेतल्याने अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती आणि रक्तस्त्राव देखील झाला होता. त्यांच्यावर योग्य उपचार वेळेत सुरु केले आहेत. जखमेवर देण्याचं इंजेक्शनदेखील त्यांना दिल्या गेलं आहे. त्यासोबतच टीटीचं इंजेक्शन नागरिकांना देण्यात आलं आहे. प्राथमिक उपचार करुन त्या सगळ्या रुग्णांवर आता उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. चावा घेतलेल्या कुत्र्यावर किमान 10 दिवस नजर ठेवणं गरजेचं आहे. त्या कुत्र्याचं योग्य पालन पोषण करणं गरजेचं आहे. 10 दिवसात कुत्र्याचा मृत्यू झाला तर कुत्र्याला रेबिज असल्याचं सिद्ध होतं, त्यामुळे कुत्र्याची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
म्हसोबा यात्रेत पिसाळलेल्या कुत्र्याने माझ्या हाताला चावा घेतला आहे. माझ्याबरोबरच 20 ते 22 जणांना देखील कुत्र्याने चावा घेतला आहे. आता सध्या आम्हाला धनुर्वाताचं इंजेक्शन दिलं आहे. मात्र रेबिजचं इंजेक्शन ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाहीत त्यासाठी पुढील उपचारासाठी आम्हाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात योग्य सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कुत्रा चावल्यास प्रथमोपचार काय करावे?
- रक्तस्त्राव थांबवण्यासाठी जखमेच्या किंवा दुखापतीभोवती स्वच्छ कापड लावा.
- दुखापत झालेली जागा पाण्याने काळजीपूर्वक स्वच्छ करा.
- जर तुमच्याकडे अँटिबायोटिक क्रीम असेल तर ते दुखापतीवर लावा.
- लालसरपणा, सूज, वेदना आणि ताप यासारख्या संसर्गाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.