PMPL च्या ताफ्यात येणार 200 CNG बस, संचालकांच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी
पुणे (Pune) शहरासाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन म्हणजेच पीएमपीएलच्या (PMPL) ताफ्यात 200 सीएनजी बस येणार आहेत.
Pune News : पुणे (Pune) शहरासाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन म्हणजेच पीएमपीएलच्या (PMPL) ताफ्यात 200 सीएनजी बस येणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी दिली आहे.
टाटा कंपनीच्या या बसची किंमत ही 47 लाख रुपये असणार
अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून CNG बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु होती. अखेर संचालकांच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. कमी किंमतीत या बस मिळणार आहेत. टाटा कंपनीच्या या बसची किंमत ही 47 लाख रुपये असणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदी करण्यासाठी अखेर मान्यता दिली आहे. आता या बस खरेदीसाठी पुणे महानगर पालिका 60 टक्के तर पिपंरी चिंचवड महानगर पालिका 40 टक्के अर्थपुरवठा करणार आहे.
एमआयडीसी आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतही बससेवा पुरवण्यात येणार
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पीएमआरडीसह एमआयडीसी आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतही बससेवा पुरवण्यात येणार असल्याची माहिती संचालक मंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या हद्दीतही बससेवा पुरवण्यात येत आहे. दरम्यान, एमआयडीसी आणि जिल्हा परिषद यांच्या हद्दीतील सेवेबद्दल कंपनीला संबंधित संस्थांकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. त्यामुळं बस खरेदीसाठी या संस्थांनी देखील आर्थिक मदत करावी, अशा मागणीचे पत्र व्यवस्थापनाच्या वतीनं पीएमईरडीए, जिल्हा परिषद, आणि एमआयडीसीला देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.
तिकीट दर वाढणार का?
दरम्यान, नवीन बस आल्यानंतर तिकीट दरवाढ होणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत देखील तिकीट दरवाढीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. मंत्रीमंडळातील खातेवाटपानंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळं दर वाढणार की नाही? यााबबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या: