Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर अपघाताचे सत्र, दारुच्या नशेत मर्सिडिज चालवली, कीर्तन करून परत जाणाऱ्या तरुणाचा जीव घेतला
Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पूल परिसरात झालेल्या तीन अपघातात तिघांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली.

पुणे : शहरातील नवले पूल परिसरात पुन्हा एकदा अपघाताचं सत्र (Pune Navale Bridge Accident) पाहायला मिळालं आहे. तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका प्रकरणात महाविद्यालयातील तरुणाने दारूच्या नशेत गाडी चालवली आणि निरपराध तरुणाचा जीव घेतला. मधल्या काळात अपघातांची मालिका थांबलेल्या नवले पूल परिसर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसंतय.
Pune Navale Bridge Accident : दारुच्या नशेत गाडी चालवली, एकाचा मृत्यू
पहिला अपघात शनिवारी पहाटे 3.30 वाजता झाला. शुभम भोसले या महाविद्यालयीन तरुणाने दारू पिऊन मर्सीडिज कार चालवली आणि त्या कारने धडक दिल्याने कुणाल हुशार या तरुणाचा बळी गेला. शुभम भोसले आणि त्याचे मित्र निखील रानडे, श्रेयस सोळंखी आणि वेदांत इंद्रसिंग राजपुत या चौघांनी आधी हिंजवडी परिसरात दारु पार्टी केली. त्यानंतर ते पुणे बंगळुरु महामार्गावरुन कात्रजच्या बोगद्याच्या दिशेने गेले.
तिथून परत येत असताना वडगाव पुलावर त्यांनी किर्तनाचा कार्यक्रम उरकून घरी निघालेल्या कुणाल हुशार आणि प्रज्योत पुजारी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामधे कुणाल हुशारचा मृत्यू झाला. तर प्रज्योत पुजारी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Navale Bridge Accident : ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
शनिवारी दुपारी अडीच वाजता एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने तीन वाहनांना धडक दिली. त्यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये दुकाचीस्वार सरळ ट्रकच्या टायरखाली आला. या ट्रकने इतर तीन वाहनांनाही धडक दिली आहे.
तिसऱ्या घटनेत शनिवारी सकाळी 7 वाजता अवजड वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.























