पुण्यातील रिक्षाचालकांसाठी खुशखबर! रिक्षांचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी मनपा देणार अनुदान
Pune News Update : पुण्यातील रिक्षांचे ई रिक्षामध्ये (Rickshaws Into E Rickshaws) रूपांतर करण्यासाठी महानगरपालिका (Pune Municipal Corporation ) 25 हजार रूपयांचे अनुदान देणार आहे.
Pune News Update : पुण्यातील रिक्षा चालकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील रिक्षांचे ई रिक्षामध्ये (Rickshaws Into E Rickshaws) रूपांतर करण्यासाठी महानगरपालिका (Pune Municipal Corporation ) 25 हजार रूपयांचे अनुदान देणार आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुणे शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेकडून मोहीम राबण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे अनुदान देण्यात येणार आहे.
रिक्षाचे ई-रिक्षामध्ये रूपांर करण्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यातील 25 हजार रूपये हे पुणे महानगरपालिकेकडून देण्यात येणार आहेत. उर्वरित 60 टक्के रक्कम वाहन मालकाला खर्च करावी लागणार आहे. याशिवाय, पालिका या इ रिक्षांच्या चार्जिंगसाठी शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन देखील उभारणार आहे.
पुणे शहरात पेट्रोल, डिझेलमुळे प्रदूषण वाढताना दिसत आहे. शिवाय इंधनाचे दर देखील आवाक्याबाहेर गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार पुण्यात देखील हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महापालिकेकडून 25 हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्यामुळे रिक्षा चालकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
दरम्यान, यापूर्वी शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून तीन चाकी आॅटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी प्रत्येकी बारा हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यानंतर आता रिक्षाचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न
पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. शहरातील वाहने देखील प्रदूषणात भर टाकत असल्याने आरटीओ कार्यालयाकडून पीयूसीची कारवाई तीव्र करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सर्व वायुवेग पथकांना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले होते.
महत्वाच्या बातम्या