पुणे महापालिकेची हद्दवाढ; 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश, भाजप- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई
पुणे महापालिकेमध्ये 23 गावांचा समावेश झाल्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे.
पुणे : मुंबईत काल उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्यातील प्रशासकीय अधिकारी आणि पुण्यातील काही आमदार यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत पुण्या लगत असणाऱ्या तेवीस गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्यात यावा यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयानंतर पुणे महापालिका की राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारे महापालिका ठरणार आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानंतर पुणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिकेमध्ये 23 गावांचा समावेश झाल्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे. तेवीस गावांच्या समावेशामुळे पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ हे 485 चौरस किलोमीटर इतके होणार आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मुंबई सर्वात मोठी महापालिका राहणार असली तरी आकाराने पुणे महापालिका सर्वात मोठी होणार आहे. या गावांच्या समावेशामळे पुण्याची हद्द चारही बाजूंनी वाढणार आहे. त्याचबरोबर पुण्याच्या लोकसंख्येतही दहा ते बारा लाखांची भर पडणार आहे.
पुणे महानगरपालिकेचा दरवर्षीच बजेट अंदाजे आठ हजार कोटीच्या घरात असतं. इतकं प्रचंड बजेट असूनदेखील शहरातील मूलभूत सुविधा देखील पूर्ण होत नाहीत.रस्त्यासाठी, पाण्यासाठी येथील नागरिकांना दरवर्षी झगडावं लागतं. त्यात या तेवीस गावांचा नव्याने पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्याने या नागरिकांना देखील मूलभूत सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. तीन वर्षांपूर्वी 11 गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला होता.. तेथील नागरिकांना आतापर्यंत मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाही, असे असताना या तेवीस गावातील नागरिकांचा विचार महापालिका प्रशासन खरंच करेल काय असा प्रश्न येथील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
महानगरपालिकेत समावेश झाल्यास आनंदच आहे अशी भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. परंतु महानगरपालिकेत गेल्यानंतर आम्हाला अधिकचा कर द्यावा लागेल. घरपट्टी, पाणीपट्टी भरावी लागेल.. त्या प्रमाणात आम्हाला इतर सुविधा मिळतील काय असा प्रश्नही या ग्रामस्थांनी उपस्थित केला.
या 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यावरुन पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीमधे आरोप प्रत्यारोप होत आहे. या गावांच्या समावेशासोबतच राज्य सरकारने या गावांच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपये द्यावेत अशी भाजपची मागणी आहे तर भाजप सरकारने त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ही गावे समाविष्ट न केल्याने या गावांच्या विकास आराखड्यासाठी लागणाऱ्या निधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप आहे.
23 गावांचा महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर आता पुणे महापालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी होणार आहे.