(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Metroman Death : ‘पुण्याचे मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचं निधन
Pune metroman death : ‘पुण्याचे मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. पुणे मेट्रो प्रकल्पात त्यांचा मोठा वाटा होता.
Pune metroman death : ‘पुण्याचे मेट्रोमॅन’अशी ओळख असलेले शशिकांत लिमये यांचं निधन झालंय. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलंय.
हृदयविकाराच्या झटक्याने काल त्याचं राहत्या घरी निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापुर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. भारतीय रेल्वेतील तज्ञ अधिकारी म्हणूनसुद्धा त्यांची ओळख होती.
2014 मध्ये महामेट्रोने त्यांची पुणे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. पुणे आणि पिंपरीतील मेट्रोचा आराखडा तयार करण्यातही लिमये यांची महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई आयआयटीमधून लिमये यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत नोकरीला लागले.
कोकण रेल्वेसह विविध भागात त्यांनी जबाबदारी पार पाडल्यानंतर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदावरून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतरही ते सक्रिय होते. तीन खासगी कंपन्यांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.
महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण कसं करता येईल आणि तसंच पुण्याभोवती लोहमार्गाचे विस्तारीकरण कसं असेल त्याचाही आराखडा लिमये यांच्या सल्ल्याने तयार करण्यात आले होते.
शशिकांत लिमये यांना ‘पुण्याचे मेट्रोमॅन’का म्हणतात-
पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 2012 पासून मेट्रो प्रकल्पासाठी ते आग्रही होते. पुणे मेट्रोचा आराखडा त्यांनी योग्य सल्ला दिला होता. 2014 मध्ये महामेट्रोद्वारे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
शशिकांत लिमये हे प्रतिष्ठित रेल्वे इंजिनिअर होते. पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पुर्ण करण्यात त्यांचं मोलाचा वाटा होता. पुणे मेट्रोच्या कल्पनेच्या पहिल्या दिवसांपासून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं हे आमचं भाग्य आहे. पुणे मेट्रोचं नियोजन त्याबाबतच्या तांत्रिक नियोजनासाठी त्यांची मोठी मदत झाली. आज त्यांच्या अचानक जाण्याने मोठं नुकसान झालं आहे, अशी भावना महामेट्रोचे महासंचालक हेमंत सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.