(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll election : कमीत कमी मतांनी भाजपचा पराभव व्हावा यासाठी मुख्यमंत्री प्रचारात; प्रचार संपताच रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल
कसबा मतदारसंघात कमीत कमी मतांनी पराभव व्हावा, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल कसब्याचे कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
Pune Bypoll election : कसबा मतदारसंघात (Pune Bypoll Election) भाजपचा कमीत कमी मतांनी पराभव व्हावा, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल कसब्याचे कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. कसब्यात रविंद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात तगडी लढत आहे. त्यासाठी रविंद्र धंगेकरांना हरवण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम सोडून दिवसरात्र कसब्यात फिरत आहेत, असंही ते म्हणाले.
रविंद्र धंगेकर म्हणाले की, पुणे पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैशाचा वापर केला जात आहे. शिवाय जातीय फूटदेखील पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. मागील 20 वर्षांपासून मी कसब्यात नगरसेवक आहे. आतापर्यंत कसब्यात अनेक कामं केली. त्यामुळे केलेल्या कामाची पावती म्हणून कसब्यातील जनता मला निवडून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'आधी काम मग सत्कार'
निवडणूक जिंकल्यावर अनेक ठिकाणी सत्काराचे कार्यक्रम ठेवले जातात, मात्र धंगेकरांनी विजय मिळाल्यानंतर सत्कार न करता कामाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलंय. मुक्ता टिळकांनी कसब्यात कामं केली, मात्र त्यांची नियोजित कामं मी पूर्ण करुन त्यांना कामातून श्रद्धांजली वाहणार असल्याचंही रविंद्र धंगेकर म्हणाले. कसब्याची निवडणूक आता कसबेकरांनी हाती घेतली आहे. कसबेकरांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी माझा विजय निश्चित मानतो, असंही ते म्हणाले.
भाजपसमोर तगडं आव्हान...
कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. त्यामुळे धंगेकरांच्या प्रत्येक हालचालीवर भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मंडळींकडून बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्य़ातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळत आहे. शेवटच्या दिवशी रासने यांच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी भाजपच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.