Pune Cats: रात्री-अपरात्री ओरडण्याचे आवाज येत असलेल्या हडपसरमधील फ्लॅटचा दरवाजा उघडताच सगळेच चक्रावले, समोरचं दृश्य पाहून...
Pune Cats: हडपसरमध्ये एका प्लेटमध्ये साडेतीनशे मांजरी असल्याच्या घटनेने खळबळ उडाली, आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही मालक प्रतिसाद देत नसल्याचा रहिवाशांचं म्हणणं आहे.

पुणे: पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याने संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे आणि त्रासाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका 3BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवासी हैराण झाले आहे. त्यांनी याबाबतची तक्रार देखील नागरिकांनी केली आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचं आणि मालक प्रतिसाद देत नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.
रहिवाशांचा मनस्ताप वाढला
सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मांजरांमुळे सतत येणारा उग्र वास, ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा प्रचंड आवाज यामुळे शेजारी राहणाऱ्यांना त्रास होत आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी मांजरांचे मोठ्या आवाजात ओरडणे, तसेच त्यांचा घाण वास संपूर्ण परिसरात पसरतो आहे, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे.
महापालिका आणि पोलिसांत तक्रार दाखल
रहिवाशांनी 2020 मध्येच पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी संबंधित महिलेकडे 50 मांजरी असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत हा आकडा 350 वर पोहोचला आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.
आरोग्याच्या धोक्याची शक्यता
रहिवाशांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, या मांजरांमुळे काही आजार पसरू शकतात, त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशी त्यांची मागणी आहे. या विचित्र घटनेमुळे पुणेकरांमध्ये चर्चेला उधाण आले असून, आता महानगरपालिकेची पुढील कारवाई काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
