"मला कष्टाची भाकरी पाहिजे," वयाच्या 85व्या वर्षी जगण्यासाठी पुण्याच्या आजीबाईंची कसरत
आजीबाई पुण्यात काठ्यांचा खेळ सादर करत असतानाचा व्हिडीओ शूट करुन कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या काठ्यांचा खेळ सादर करत असल्याचं समोर आलं.
पुणे : सोशल मीडियावर जर तुम्ही अॅक्टिव्ह असाल तर सफाईदारपणे लाठ्याकाठ्या फिरवत असलेल्या आजीबाईंचा व्हिडीओ तुमच्या नजरेस नक्कीच पडल्या असतील. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या काठ्यांचा खेळ सादर करत असल्याचं या व्हिडीओमध्ये सांगितलं जात आहे. या आजीचं वय 85 वर्षे असून शांताबाई पवार असं त्यांचं नाव आहे. पुण्यातील हडपसर परिसरात त्या आपल्या कुटुंबासह राहतात. या वयातही ज्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आजीबाई पुण्यात काठ्यांचा खेळ सादर करत असतानाचा व्हिडीओ शूट करुन कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला. अल्पावधीतच तो अनेक नेटिझन्सपर्यंत पोहोचला. अभिनेता रितेश देशमुखनेही त्यांचा हा काठी फिरवतानाचा व्हिडीओ शेअर करत 'वॉरिअर आजी मा' असे त्याला कॅप्शन दिलं. त्यानंतर त्याने आजींशी संपर्कही साधला.
'मला कष्टाची भाकरी पाहिजे' या आजींचे कुटुंब मोठे आहे. घरची परिस्थिती हलाखीची आणि बिकट आहे. त्यामुळे नातवांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये यासाठी त्या रस्त्यावर लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवतात. याविषयी त्या म्हणतात की, "आधी हाताला चटके, मग मिळतेची भाकर. मला कष्टाची भाकर पाहिजे. कारण कोणाची आई वारली, कोणाचे आई-वडील वारले अशी लेकरं माझ्याकडे आहेत. रस्त्यावर जाऊन काठ्यांचा खेळ करते. कोणी दहा रुपये, कोणी पाच रुपये देतं. ते दिवसभर गोळा करते. घरी येऊन या अनाथ लेकरांच्या स्वयंपाकाची सोय करते." तसंच मी आठ वर्षांची असताना आई-वडिलांनी ही कला शिकवली, ती मी अजून विसरली नसल्याचं या आजीबाई सांगतात.
मला कोरोनाची भीती नाही उधारी मागायला गेले होते. पण कोणी दिली नाही. मी मेले तर माझ्या लेकरांचं काय होईल? काहींनी म्हाताऱ्या लोकांना कोरोना होती अशी भीती दाखवली. मी म्हटलं कोरोना झाला तर घराचं तोंड बघणार नाही. तिथेच मरेन. पण मी बाहेर पडल्यावरच माझ्या मुलांचं पोट भरेल. देवाने मला असं ठेवलंय की मला कोणता कोरोनाही नाही, असं या आजी म्हणाल्या.
तरुणपणी सीता और गीता, शेरणी या हिंदी चित्रपटात या आजींनी काम केलं आहे. "मी शाळा हायस्कूलमध्ये मुलांसमोर कार्यक्रम केले आहेत. परंतु नातवांनी या खेळात येऊ नये अशी माझी इच्छा आहे. मला त्यांना शिक्षण द्यायचं आहे," असा निर्धार आजींनी बोलून दाखवला.
Grandma Shantabai Pawar | कशासाठी? पोटासाठी! 'व्हायरल' आजीची कसरत, शांताबाई पवारांची संघर्षकथा