(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Firing : पुणे पुन्हा गोळीबाराने हादरलं, उरूळी कांचनमधील इनामदार वस्तीजवळील घटना, तिघांवर गोळीबार झाल्याची माहिती
Pune Firing : पुण्यामध्ये मागील काही दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील उरूळी कांचन येथे एक गोळीबाराची घटना समोर आली आहे.
पुणे: गेल्या काही दिवसामध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी होताना दिसत आहे, अशातच आता उरूळी कांचन परिसरात इनामदार वस्तीजवळ येथे गोळीबाराची घटना घडली आहे. बापू शितोळे या व्यक्तीने तीन ते चार जणांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारामध्ये काळुराम गोते हे गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत, घटनेचा पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.(Pune Crime News)
पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या
रविवारी सायंकाळी पुण्यातील नाना पेठे येथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून त्याचबरोबर कोयत्याने वार करण्यात आला. जवळपास 12-13 जणांची वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केल्याचं सीसीटिव्हीच्या माध्यमातून समोर आलं आहे. सदर प्रकरणी पुणे पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर आंदोकर यांच्या बहीण, मेहुणा, भाचा यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमदर्शी ही हत्या कौटुंबिक वादातून केल्याचं समोर आलं मात्र, आता या घटनेबाबत अनेक नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. या घटनेला एक महिनाही झाला नाही, तोपर्यंत उरूळी कांचन येथे गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.(Pune Crime News)
क्षुल्लक कारणास्तव खून
हडपसर परिसरात हॉटस्पॉट न दिल्यामुळं कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टोळक्याने गृहकर्ज मिळवून देण्याची एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीचा कोयत्याने डोक्यात सपासप वार करून निर्घृण खून केला. मोबाईलचे हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्याच्या कारणातून झालेल्या वादातून हा हत्या (Pune Crime News) करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय 47, रा. उत्कर्षनगर सोसायटी, सासवड रोड, हडपसर) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मयूर भोसले (वय २०, रा. वेताळबाबा वसाहत) याला अटक केली आहे. त्याचबरोबर त्याच्यासह आणखी तीन अल्पवयीन आरोंपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वासुदेव कुलकर्णी यांचा भाऊ विनायक कुलकर्णी (वय 51) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (ता.1) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास उत्कर्षनगर सोसायटीच्या समोरील फुटपाथवर सासवड रोड येथे घडली आहे.