Pune Fire Brigade : वा रे पठ्ठ्या! आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानानं दिलं जीवनदान; जवानाचं सर्वत्र कौतुक
आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानाने जीवनदान दिले आहे. राहत्या घरात तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत होता, दार फोडत त्याची सुटका करण्यात आली आहे.
Pune Fire Brigade : आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानाने जीवनदान दिले आहे. राहत्या घरात तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी लगेच अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली. जवान तातडीने घटनास्थळी हजर झाले आणि घराचं दार फोडत तरुणाची सुटका केली. ही घटना पुण्यातील (pune) श्रद्धा अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक सिंहगड रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास घडली. या घटनेत तरुणाला जीवनदान दिल्याने अग्निशमन दलाच्या जवानांचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोहोचताच अधिकारी आणि जवानांनी लगेचच पोलिसांकडून माहिती घेत बचावकार्यास सुरवात केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामधे तरुणाचा ओरडण्याचा आवाज येत होता. हा प्रकार घडत असताना जवानांनी मुख्य लाकडी दरवाजा आणि लोखंडी दरवाजा याला बोल्ड कटरने तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाक घरामधे तरुण पंखा आणि गळ्यामधे नायलॉनची दोरी अडकवून एका लाकडी स्टुलवर उभा असलेला दिसला.
जवानांनी तातडीने दोरी तोडत त्याला खाली उतरवून वेळेवर त्याची सुखरुप सुटका करत त्याला जीवदान दिले. या ठिकाणी उपस्थित पोलिसांची मोठी मदत झाली. तसेच त्यांच्याकडून माहिती लवकर मिळाल्याने सदर तरुणाचे प्राण वाचविण्यात यश आले. या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर, चालक संतोष चौरे, फायरमन सतीश डाकवे, संजू चव्हाण आणि मदतनीस कोकरे यांनी सहभाग घेतला.
मध्यरात्रीही कायम चोख कामगिरी
एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना मध्यरात्री दुथडी वाहत असलेल्या नदीपात्रातून प्रवास करणं भोवलं होतं. रात्री पावने दोनच्या सुमारास नदीपात्रातून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि गाडी वाहून जात एस एम जोशी पुलाखाली अडकली होती. मध्यरात्री नदीपात्रात गाडी वाहून जात आहे अशी माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जवानांच्या प्रसंगावधानामुळे या एकाच कुटुंबातील पाचही व्यक्तींचे प्राण वाचले होते. जवान रोप, लाईफ जॅकेटच्या साह्याने नदी पात्रात उतरले. जवानांनी समयसूचकता दाखवत गाडी जवळ पोहचत एकाच कुटुंबातील पाचही जणांचे प्राण वाचवले.
पालघरहून पुण्यात वाणी कुटुंब नातेवाईकांकडे आलं होतं. या कामगिरीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं. पुणे महापालिकेच्या वतीने त्या जवानांचा सत्कार देखील करण्यात आला होता. पालघरहून पुण्यात वाणी कुटुंब नातेवाईकांकडे आलं होतं. वऺचिका वाणी, प्रिया वाणी, कुणाल वाणी, कपिल लाल वाणी, कृष्णा वाणी अशी पाच व्यक्तींची नावे होती.