Pune Crime News : दादागिरी कधी थांबणार? मित्राच्या खिशातून न विचारता मोबाईल काढला, मित्रानेच दगडाने ठेचून केली हत्या
पुण्यातील भोसरी परिसरात एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या मित्राची परवानगी न घेता खिशातून मोबाईल काढून घेतल्याने त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याचं अनेक घटनांमधून समोर येत आहे. त्यातच पुण्यातील भोसरी परिसरात एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या मित्राची परवानगी न घेता खिशातून मोबाईल काढून घेतल्याने त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नारायण वाघमारे असे हत्या केलेल्याचं नाव असून अमर उर्फ अक्क्या गौतम कसबे (वय 24 वर्षे, रा. यशवंत नगर, सेक्टर 7, एमआयडीसी, भोसरी, पुणे) असं आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
वाघमारे याने कसबे यांच्या खिशातून मोबाईल फोन त्यांच्या परवानगीशिवाय काढून घेतला, याचा राग येऊन आरोपी कसबे याने वाघमारेचं डोके दगडाने ठेचून त्याची हत्या केली आहे. हत्या झालेल्या मुलाचा भाऊ वाघमारे आणि त्याचा मित्र यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इंद्रायणीनगर येथील यशवंत चौकात बोलत असताना नारायणने मस्करी करत अमरचा फोन खिशातून काढून घेतला. याचा राग आल्याने अमरने नारायणला हाताने मारहाण करुन खाली पाडले आणि डोक्यावर दगडाने वार करुन गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलीस आरोपीच्या मागावर असतानाच गुन्हे शाखेचे पोलिसांना अमर नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असून सध्या लोणावळा रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी रेल्वे स्थानकावर जाऊन सापळा रचून आरोपीला अटक केली. सुरुवातीला आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र ससून रुग्णालयात उपचारादरम्यान नारायण वाघमारे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोपीविरुद्ध कलम 307 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दादागिरी कधी थांबणार?
मागील काही दिवसांपासून पुण्यात क्षुल्लक कारणावरुन हत्या आणि हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेक गॅंगदेखील सक्रिय झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाने 'भाई' न म्हटल्याने गुंडांच्या टोळीने जीवे मारणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या टोळीने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन त्याला जखमी केले होते. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना खडकीतील शिवाजी पुतळ्याच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती आणि चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या हल्ल्यात तक्रारदार जखमी झाला. त्यानंतर त्या तक्रारदाराचा मोबाईल फोन देखील फोडला. हा सगळा प्रकार पाहून परिसरातील लोकांनी भांडणं सोडवण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी गर्दीदेखील केली मात्र या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली. वेत लोखंडी रॉड फिरवून लोकांना तुम्ही इथे थांबू नका याला आम्ही जिवंत सोडणार नाही. यावेळी परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.