Pune crime news : तरुणांना धाक नेमका कुणाचा? ट्राफिक पोलिसांनी कार थांबवली अन् पठ्ठ्याने पोलिसांनाच फरपटत नेलं...
Pune News : ट्राफिक पोलिसांनी एका कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच कार चालकाने थेट पोलिसांनाच 50 मीटरपर्यंत फरपटत नेल्याचं समोर आलं आहे.
Pune crime news : पुण्यातील गुन्हेगारी आणि पुण्यात (Crime) घडणाऱ्या घटनांची संख्या पाहता पुण्यातील आरोपींना किंवा गुन्हेगारांना पोलिसांना धाक उरला नसल्याचं स्पष्ट होत आहे. अशीच एक घटना आज समोर आली आहे. ट्राफिक पोलिसांनी एका कारला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कार चालकाने थेट पोलिसांनाच 50 मीटरपर्यंत फरपटत नेल्याचं समोर आलं आहे. ही सगळी घटना खडकी पोलिस ठाण्याच्या समोरील चर्चा चौकात घडली आहे. या प्रकारणी कार चालकाला अटकही केली आहे.
सुरज भारत जाधव असे अटक केलेल्याचे नाव आहे. याच्याविरोधात पोलिस अंमलदार गणेश शिवाजी राबाडे यांनी तक्रार दाखल केली होती. नेहमीप्रमाणे पोलीस खडकी परिसरातील एका चौकात उभे होते. त्यावेळी त्यावेळी रेल्वे अंडरपासकडून लेन कट करून आलेल्या एक्सेंन्ट कार नंबर एमएच 12 क्युजी 4265 ला त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी सुरज भारत जाधवने कार न थांबवता राबाडे यांच्यावर अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी राबाडे यांनी बोनेटवर उडी मारली. सुरजने भरधाव वेगातील कार न थांबवता कार थेट पोलिसांच्या अंगावर नेली यात पोलीस 50 मीटरपर्यंत फरपटत गेले. हा सगळा प्रकार पाहून त्या परिसरातील नागरिक गोळा झाले आणि त्यांनी सुरजला कार थांबवण्यासाठी भाग पाडलं. या घटनेत या घटनेमध्ये राबाडे यांच्या डाव्या पायाच्या घोटयास मार लागला असून ते जखमी झाले आहेत.
पुण्यात पोलिसच असुरक्षित?
पुण्यात महिला पोलिसांला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अश्लील शिवीगाळ करुन महिला पोलिसाला चपलेने मारहाण करण्यात आली होता. माझी गाडी का उचलली, याचा जाब विचारत त्या महिला पोलिसाला जबर मारहाण करण्यात होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला अटक केली होती. या प्रकरणी महिला पोलिसाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आलं होतं. सीता रमेश पुजारी (वय 35 वर्षे, रा. ताडीवाला रोड) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. वाहतूक पोलिसांनी एका महिलेची गाडी उचलली होती. अलका टॉकिज परिसरात हा प्रकार घडला होता. माझी गाडी का उचलली असा जाब त्या महिलेने पोलीस महिलेला विचारला होता. त्यावेळी पोलीस महिलेने माझी पोस्टिंग या परिसरात नाही त्यामुळे मला याबाबत माहिती नाही," असं उत्तर दिलं होतं. यावरुन दोघींमध्ये वाद झाला आणि चपलेने मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.