Pune Crime | कडक लॉकडाऊनमध्येही पुण्यात खुनाचा थरार, सलग दोन दिवसात तिघांची हत्या
पुणे शहरात लॉकडाऊन असताना, रात्री संचारबंदी असताना सलग दोन दिवशी खुनाच्या घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे
पुणे : कडक लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी असतानाही सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात खुनाचा थरार पाहायला मिळला. पुण्यात दोन दिवसात तीन जणांची हत्या झाली आहे. खून झालेल्यांमध्ये एक पोलीस कर्मचारी, एक तरुण आणि देहविक्री करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी (5 मे) दोन तरुणांवर अज्ञातांनी तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. यामध्ये शाम सोनटक्के (वय 24 वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला तर योगेश चव्हाण (वय 19 वर्षे) हा तरुण गंभीर जखमी झाला पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं कळतं. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलीस संशयितांच्या मागावर आहेत.
फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून
तर मंगळवारी (4 मे) पुणे शहरातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून झाले. तडीपार गुंड प्रवीण महाजनने पोलीस कर्मचारी समीर सय्यद (वय 45 वर्षे) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन निर्घृण खून केला. खून झाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्या पोलिसांनी प्रवीण महाजनला ताब्यात घेतलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रवीण महाजनला मागील वर्षी पुणे शहर आणि जिल्ह्यातील एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं.
या गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच तिथूनच काही अंतरावर एका महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अज्ञाताने देहविक्री करणाऱ्या या महिलेची हत्या केल्याचं समोर आलं. पुणे शहरात लॉकडाऊन असताना, रात्री संचारबंदी असताना सलग दोन दिवशी खुनाच्या घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. सिंहगड पोलीस आणि फरासखाना पोलीस या हत्येचा तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
