Pune crime : पुण्यात मुलंही असुरक्षित? गुंडांनी तळजाई पठारावर काढले अल्पवयीन मुलाचे नग्न फोटो
भांडणातील मुलांची नावं न सांगितल्यामुळे गुंडांच्या टोळीने अल्पवयीन मुलाला पळवून नेत त्याचे लग्न फोटो काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर तळजाई परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
![Pune crime : पुण्यात मुलंही असुरक्षित? गुंडांनी तळजाई पठारावर काढले अल्पवयीन मुलाचे नग्न फोटो Pune crime news Goons took nude photos of a minor on Taljai Plateau POSCO act pune news update Pune crime : पुण्यात मुलंही असुरक्षित? गुंडांनी तळजाई पठारावर काढले अल्पवयीन मुलाचे नग्न फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/c37def91962fdd919165fb022f0738211677927598466442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune crime : पुण्यात सध्या गुन्ह्यांची संख्या सातत्याने (Pune Crime News) वाढत आहे. अनेक गुंडाच्या टोळ्या सक्रिय आहे. ही टोळी सामान्य नागरिकांचा छळ करत असल्याच्या घटना आजपर्यंत अनेकदा समोर आल्या आहे, आता लहान मुलेही यातून सुटलेली नाहीत. अशीच एक घटना पुण्यातील तळजाई पठार परिसरातून समोर आली आहे. भांडणातील मुलांची नावं न सांगितल्यामुळे गुंडांच्या टोळीने अल्पवयीन मुलाला पळवून नेत त्याचे नग्न फोटो काढल्याची घटना समोर आलं आहे. या प्रकारानंतर तळजाई परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी धनकवडीत राहणार्या मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित पाटील ऊर्फ मायाभाई (रा. जनता वसाहत), प्रमोद कळंबे या सराईत गुंडासह त्याच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लक्ष्मीनगर येथील शाहू कॉलेज येथून सूर्या चौक आंबेगाव आणि तळजाई पार येथे गुरुवारी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी पोलिस चौकशी सुरु आहे. अल्पवयीन मुलगा हा शाहू कॉलेज परिसात असताना त्याला टोळीने जबरदस्तीने मोटारसायकलवर दोघांमध्ये बसवून साई सिद्धी चौकापासून सूर्या चौकात नेले. तेथून तळजाई पार येथे मोकळ्या मैदानात आणले. त्याला दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणांमधील मुलांची नावं विचारायला सुरुवात केली. मात्र त्या मुलाला नावं माहिती नव्हती. त्यामुळे त्या मुलाने गुंडांना नावं माहित नसल्याचं स्पष्ट सांगितलं. नावं माहित नसताना त्या मुलांना घेऊन ये असा तगादा लावला आणि धारदार हत्यार गळ्याला लावून खल्लास करुन टाकण्याची त्याला धमकी दिली. त्यावेळी मुलगा घाबरला त्यानंतर गुंडांच्या टोळीने त्याना नग्न करुन त्याचे फोटो काढले.
वडिलांनी थेट पोलिसांत धाव घेतली
हा सगळा प्रकार घडल्यानंतर मुलगा घाबरलेल्या अवस्थेत घरी परतला. त्याने घडलेली घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी हा प्रकार ऐकून थेट पोलिसांत धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली आणि दोघांवर गुन्हा दाखल केला. अभिजित पाटील आणि प्रमोद कळंबे हे सराईत गुंड आहेत.
मुलंही असुरक्षित?
पुण्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज नवे गुन्हे समोर येतात. लैंगिक अत्याचाराबारोबरच लहान मुलांचादेखील मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढत आहेच, मात्र आता अल्पवयीन मुलांचंही शोषण होत आहे, त्यांचेही नग्न फोटो व्हायरल करण्याचे प्रकार पुण्यात सुरु असल्याचं या घटनांमधून समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)