तळेगाव हादरलं! इंस्टाग्रामच्या स्टेट्समुळं लोखंडी हथोड्याने अकरावीतील विद्यार्थ्यांची हत्या
Pune Crime News : इंस्टाग्रामच्या स्टेट्समुळं लोखंडी हथोड्याने अकरावीतील विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आलेल्याची धक्कादायक घटना पुण्यातील तळेगावमध्ये घडली आहे.
Pune Crime News : इंस्टाग्रामच्या स्टेट्समुळं लोखंडी हथोड्याने अकरावीतील विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आलेल्याची धक्कादायक घटना पुण्यातील तळेगावमध्ये घडली आहे. सख्ख्या चुलत भावाने मित्राच्या मदतीने तळेगावमधील दशांत परदेशीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. लोखंडी हथोड्याने आधी डोक्याच्या मागून आणि मग डोळ्यावर प्रहार केला. त्यामुळं बंदुकीची गोळी झाडून हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत होतं. दशांत नेहमी खुन्नस देत धमकावायचा, तसेच काही दिवसांपूर्वी फक्त 302 अशा आशयाचे स्टेटस ही ठेवले होते. हे स्टेटस फक्त दोन्ही आरोपींनाच दिसत होते. त्यामुळे रागीट स्वभावाच्या दशांतवर सख्खा चुलत मोठा भाऊ कमलेश परदेशी (वय 19) आणि मित्र प्रकाश लोहार (वय 19) खार खाऊन होते. यातूनच दशांतचा काटा काढायचा असा कट या दोघांनी रचला.
दशांतला फोटो- व्हिडीओ काढून एडिटिंग करण्याचा आणि ते इन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा छंद होता. यासाठी त्याने खास महागडा फोनही खरेदी केला होता. त्यामुळे दोन्ही आरोपींनी फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा बहाणा बनवला. त्यानुसार प्रकाशने दशांतला फोन करून बोलावलं. सायंकाळी सहा वाजता हे दोन्ही आरोपी त्याला भेटले आणि तिथून एका बंद कंपनी समोर पोहचले. दशांत त्याच्या महागड्या फोनवर या दोघांचे फोटो घेत होता, तेंव्हाच हथोडा काढून मागून एकाने डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर डोळ्यावर हल्ला केला. यात दशांतचा जागीच मृत्यू झाला.
दुसरीकडे दशांतचा संपर्क होत नसल्याने कुटुंबीय त्याच्या शोधात होते. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असता शोधकार्यात त्याचा मृतदेह आढळून आला. डोक्याच्या मागून आणि डोळ्यातुन रक्तस्राव होत असल्याने अज्ञातांनी बंदुकीची गोळी झाडून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत होतं. यावेळी दशांतचा सख्खा चुलत मोठा भाऊ कमलेश आणि मित्र प्रकाश ही तिथं उपस्थित होते. आज सकाळी देखील पोलिसांसोबत ते घटनास्थळी आले होते. मात्र पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र हलवली, तेंव्हा शेवटचा फोन प्रकाशने केल्याचं दिसून आलं. मग पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेताच, त्यांचं बिंग फुटलं. दोघांनी हत्या केल्याची कबुली देताच पोलिसांसह कुटुंबियांना देखील धक्का बसला.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live