(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime: पुण्यातील पेशवेकालीन मंदिरात चोरी; मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी, सीसीटीव्हीवरून तपास सुरू
Pune Crime: पुण्यातील एका पेशवेकालीन मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे: सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात (Pune News) गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र दिसून येत आहे, खून, चोरी, हत्या, महिला, अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, या घटना सुरूच आहेत. मात्र, आता पुण्यातील (Pune News) एका पेशवेकालीन मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील (Pune News) पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यामध्ये असलेल्या सहा हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर कौस्तुभ उल्हास गाडे (वय 40, रा. ओंकारेश्वर मंदिर, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरात शनिवारी मध्यरात्री शिरलेल्या चोरट्याने गाभाऱ्यातील दानपेटीचे कुलूप तोडून सहा हजार रुपये चोरुन नेले. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर गाडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
या घटनेची माहिती मिळताच तत्काळ गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, चोरट्याचा माग काढण्या येत आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.