(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Corona Update : पुणे शहरात गेल्या 24 तासात शून्य मृत्यू तर 59 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Pune Corona Update : सध्या पुण्यात 739 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 124 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 112 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात आतापर्यंत 494402 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासात शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात मृत्यूसंख्येत कमालीची घट झाल्याचं चित्र सध्या आहे. तर पुण्याबाहेरील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 739 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 124 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरात 9074 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज एकूण 6200 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे. तर 35 टक्के लोकांना यासाठी पैसे मोजले आहेत. पुणे शहराचं 100 टक्के लसीकरण होण्यासाठी मार्च 2022 पर्यंतचा कालावधी लागू शकतो.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जवळपास 6 लाख पुणेकरांना अद्याप एकही डोस मिळालेला नाही. ऑक्टोबर अखेरपर्यंत या सर्वांना पहिला डोस देण्याचं उद्धिष्ट ठेवण्यात आलेय. पुढील काही दिवसांत पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकतो. कोविशिल्ड लस घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, तो सहज रित्या उपलब्ध आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस वर्षाअखेरपर्यंत होईल. पुणे जिल्ह्यातील आर्ध्याहून आधिक लोकसंख्येला अद्याप लस मिळालेली नाही. पुणे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय देशमुख म्हणाले की, या महिन्यात पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस 54 दिवसानंतर होईल. लसीकरणासाठी पात्र असलेल्या पुण्यातील सर्वांच्या लसीकरणाला मार्च 2022 पर्यंतचा कालावधी लागेल. पुढील काही दिवसांत लसीकरणासाठी पात्र असलेल्या 50 टक्के लोकांचे दुसरे डोस पूर्ण होतील. ही संख्या 42 लाख इतकी असेल.
देशात गेल्या 24 तासांत 14 हजार कोरोनाबाधितांची नोंद
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. देशात दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा घटला असला तरी, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या मात्र अधिक आहे. गेल्या 24 तासांत 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 57 हजार 740 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13 हजार 543 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.