(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Traffic : जरांगेंची शांतता रॅली आज पुण्यात; मोठी गर्दी होण्याची शक्यता, शहरातील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic : मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात येणार आहे, यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
Pune Traffic : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) हे राज्यभरात जनजागृती शांतता फेरी काढत आहेत. सोलापूर आणि सांगलीनंतर आज (रविवारी) ही फेरी पुण्यात दाखल होणार आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आज (रविवारी) मराठा आरक्षण शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात येणार आहे, यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या गाड्यांचा ताफा कात्रजमार्गे सारसबाग येथे दाखल होणार आहे. सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर सकाळी अकरा वाजता शांतता फेरीला सुरुवात होणार आहे. बाजीराव रस्ता, शनिवारवाडामार्गे ‘एसएसपीएमएस’ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून फेरी जंगली महाराज रस्त्याने पुढे जाणार आहे. डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर खंडुजीबाबा चौकात फेरीची सांगता होणार आहे. तेथे मनोज जरांगे (Manoj Jarange) मार्गदर्शन करणार आहेत.
सारसबाग परिसरातून आज सकाळी अकराच्या सुमारास फेरीचा प्रारंभ होणार आहे. टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रोड, झाशीची राणी चौक मार्गे फेरी काढण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना भागातील छत्रपती संभाजी पुतळा येथे फेरी विसर्जित होणार आहे. शहराच्या मध्य भागातून मनोज जरांगे यांची फेरी जाणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. फेरी मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार असल्याची माहिती, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.(Pune city Traffic diversions in place for Jarange Patil-headed rally today)
स्वारगेट परिसरातील जेधे चौक, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
जरांगेंची फेरी सुरू झाल्यावर हे मार्ग राहणार बंद
शनिपार चौक ते कुमठेकर रस्ता, बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, रमणबाग प्रशाला ते अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चैाक, जयंतराव टिळक पूल ते शनिवारवाडा, कुंभारवेस चौक ते गाडगीळ पुतळा, मंगला चित्रपटगृह ते प्रीमियर गॅरेज शिवाजी पुतळा चौक ते शिवाजीनगर न्यायालय, रेव्हेन्यू कॉलनी ते मॉडर्न चौक, झाशीची राणी पुतळा चौक ते सावरकर भवन, महात्मा फुले संग्रहालय ते झाशीची राणी पुतळा चौक या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
गोखले स्मारक चौक ते नटराज चित्रपटगृह रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. काकासाहेब गाडगीळ पूल ते केळकर रस्ता वाहतुकीस बंद असणार आहे. नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे. रसशाळा चौकातून एस. एम. जोशी पूलमार्गे वाहतूक नळस्टॉपकडे वळवण्यात येणार आहे. फेरी खंडोजीबाबा चौकात आल्यानंतर टिळक चौक ते खंडोजीबाबा चौक वाहतूक बंद राहणार आहे. या भागातील वाहतूक कुमठेकर रस्ता, टिळक रस्तामार्गे सोडण्यात येणार आहे.
जेधे चौकातून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे, मित्रमंडळ चौक, सावरकर चौकमार्गे जाणार आहे. सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जावे. नीलायम चित्रपटगृह ते सावरकर पुतळा चौक वाहतूक बंद राहणार आहे. ना. सी. फडके चौक, सणस पुतळ्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय ते पूरम चौक दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे.
वाहतूक वळवण्यात येणारे प्रमुख चौक
नवले पूल - वाहतुकीचा आढावा घेऊन नवले पुलाकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्याकडे वळविण्यात येईल.
कोंढवा खडीमशीन चौक - जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटमार्गे जातील.
कात्रज चौकमार्गे फेरी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे जाणार आहे.
फेरी मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील वाहतूक पुन्हा खुली करून देण्यात येणार आहे.
पर्यायी मार्गांचा करा वापर
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, राष्ट्रभूषण चौकमार्गे जाणारी वाहने शंकरशेठ रस्त्याने इच्छितस्थळी जातील. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक ) ते जेधे चौक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनी मार्केट यार्ड किंवा नेहरू रस्त्याने इच्छितस्थळी जावे. मार्केट यार्ड ते जेधे चौक दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. या भागातील वाहनांनी शिवनेरी रस्त्याने वखार महामंडळ चौकातून इच्छितस्थळी जावे. पंचमी हॉटेल ते जेधे चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. पंचमी हॉटेल, शिवदर्शन चौक, गजानन महाराज मंदिरमार्गे वाहनचालकांनी पर्वती गावातून इच्छितस्थळी जावे. शिवदर्शन चौकातून मित्रमंडळ चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.