(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : हवेची गुणवत्ता सुधारण्यात पुण्याचा जागतिक पातळीवर डंका;' सिटिज ब्लूमबर्ग फिलॉनथ्रॉपी अॅवार्ड'ने गौरव
Bloomberg Philanthropies Awards : पुण्याच्या हवा प्रदूषणाची समस्या सोडवण्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे. शहराला ‘सी-40' सिटिज ब्लूमबर्ग फिलॉनथ्रॉपी अॅवार्ड्स’चा विजेता म्हणून जाहीर केले
Pune News : पुण्याच्या हवा प्रदूषणाची समस्या सोडवण्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे. 'युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब्रीथ’ या गटात पुणे शहराची पुरस्कारासाठी निवड केली आहे. शहराला ‘सी-40' सिटिज ब्लूमबर्ग फिलॉनथ्रॉपी अॅवार्डस’ (Bloomberg Philanthropies Awards)चे विजेते म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच पुणेकरांच्या आणि पुणे प्रशासनाच्या प्रयत्नांनी पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हवा प्रदुषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिकाधिक ई-बसेसचा समावेश करत पुणे शहराने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांची दखल जागतिक पातळीवरील जवळपास 100 अग्रेसर शहरांच्या समूहाने घेतली असून या मानाच्या पुरस्कारासाठी पुणे शहराची निवड केली आहे.
हवामान बदलाच्या समस्यांना तात्काळ प्रतिसाद देत उपाययोजना करणाऱ्या जगातील जवळपास 100 अग्रेसर शहरांचा ‘सी-40’ हा समूह कार्यरत आहे. या समूहामार्फत हवामान बदलाच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी विविध क्षेत्रात केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करुन समूहात समाविष्ट शहरांना प्रोत्साहन दिलं जातं. या समूहाने अर्जेंटिना देशातील ब्यूनास आयरस शहरात झालेल्या कार्यक्रमात पुणे शहराला ‘सी-40' सिटिज ब्लूमबर्ग फिलॉनथ्रॉपी अॅवार्डस’चा विजेता म्हणून जाहीर केले आहे.
‘युनायटेड टू ॲक्सलरेट इमिडिएट ॲक्शन इन क्रिटीकल सेक्टर्स’, ‘युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब्रीद’, ‘युनायटेड टू बिल्ड रेझिलीएन्स’, ‘युनायटेड टू इनोव्हेटीव्ह, ‘युनायटेड टू बिल्ड अ क्लायमेट मूव्हमेंट अशा पाच गटात यावर्षी पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी हवेच्या गुणवत्तेबाबतचा पुरस्कार पुणे शहराला जाहीर करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार हे या कार्यक्रमास ऑनलाईनरित्या उपस्थित होते.
शहरातील हवा प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजनेंतर्गत उत्सर्जन कमी करणे, हवेची गुणवत्ता वाढण्यासाठी उपाययोजना करणे आणि त्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करणे या निकषांवर पुणे महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीमुळे शहराचा गौरव करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "शहराला ‘ सी-40’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. वाहतूक व्यवस्थेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा हा गौरव आहे. सार्वजनिक वाहतुकीत विद्युत बसेसचा गतीने समावेश करुन स्वच्छ आणि शाश्वत दळणवळणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. ई-बसेसचा आमचा हा उपक्रम इतर शहरांनाही मार्गदर्शक आणि प्रेरक ठरु शकेल अशा स्वरुपाचे मॉडेल तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या काळातदेखील अशाच प्रकारे पुण्यातील समस्यांवर काम करणार."