Pune Accident: बालसुधारगृहात धनिकपुत्राचे पिझ्झा-बर्गरचे चोचले बंद, घरचं जेवणही नाही; नाश्त्याला पोहे, जेवणात पोळी-भाजी
Pune News: बालसुधारगृहात धनिकपुत्राचे 'लाड' बंद, घरचं जेवण नाहीच, नाश्त्याला पोहे, दूध आणि अंडी. याच धनिकपुत्राला येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा आणि बर्गर पुरवण्यात आल्याचा आरोप आहे. 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात मुक्काम
पुणे: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या पुण्यातील बिल्डरपुत्राची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. रविवारी पहाटे अपघातानंतर (Pune Car Accident) या धनिकपुत्राला जेव्हा येरवाडा पोलीस ठाण्यात आले तेव्हा मागच्या दाराने त्याच्यासाठी पिझ्झा (Pizza) आणि बर्गर (Burger) आणण्यात आल्याचा आरोप झाला होता. मात्र, बालसुधारगृहात ( observation home) या धनिकपुत्राचे सगळे लाड बंद करत त्याला घरचे जेवण देण्यास मनाई करण्यात आली आहे. बालसुधारगृहात पहिल्या दिवशी या धनिकपुत्राला सकाळच्या नाश्त्याला पोहे, दूध आणि अंडी देण्यात आली. त्यानंतर त्याला प्रार्थनेसाठी नेण्यात आले. प्रार्थना संपल्यानंतर या मुलाचे समुपदेशन करण्यात आले. तर दुपारी आणि रात्रीच्या जेवणातही धनिकपुत्राला चपाती आणि भाजी असे साधे जेवणच देण्यात आले.
या धनिकपुत्राला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बालहक्क न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा न्यायालयात सादर करण्यात येईल. या मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनादेखील तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर नातवाच्या प्रतापामुळे त्याचे आजोब सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्या पाठीशीही एका जुन्या गुन्हेगारी प्रकरणात चौकशीचा ससेमिरा लागण्याच शक्यता आहे.
या धनिकपुत्राने दारुच्या नशेत भरधाव वेगाने पोर्शे कार (pune porsche accident) चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांच्या बाईकला धडक दिली होती. जवळपास 200 किमीच्या वेगाने बसलेल्या या धडकेत अनिश आणि अश्विनी जागीच गतप्राण झाले होते. इतक्या गंभीर दुर्घटनेनंतरही पोलिसांनी धनिकपुत्राला विशेष वागणूक दिल्याचे आरोप झाले होते. अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांना रविवारी पोलीस ठाण्यात (Pune Police) आणण्यात आले त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. एका झिरो पोलिसाने हे खाद्यपदार्थ मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात नेले, अशी चर्चा आहे. पोलिसांनी धनिकपुत्राला दिलेल्या या रॉयल ट्रिटमेंटची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी येरवाडा ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्याही चौकशीचे आदेश दिले आहेत.
आणखी वाचा
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...