Pune Bypoll election : दोन जागांसाठी उमेदवारी जाहीर होण्याआधीच 'या' तिघांनी उमेदवारीवर दावा ठोकला; संधी मिळणार का?
पुण्यात पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्व पक्षीयांंकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच तिघांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे.
Pune bypoll Election : पुण्यात चिंचवड (chinchwad bypoll election)आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्व पक्षीयांंकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच तिघांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. त्यात कसबा मतदार संघात भाजपकडून मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक (shailesh tilak) यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे तर चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे भाजपकडून दोन्ही मतदार संघात भाजपचा उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याबरोबरच चिंचवडमध्ये मात्र थोडं वेगळं चित्र बघायला मिळालं. राष्ट्रवादीच्या नाना काटे यांनी अजित पवारांच्या मुलाखतीपूर्वीच राष्ट्रवादीकडून त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे, त्यामुळे देखील खळबळ उडाली आहे.
कसबा मतदार संघाच्या उमेदवाराकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्यात शैलेश टिळक यांनी कसबा पेठेतल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. त्यामुळं त्यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार या चर्चेला उधाण आलं आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदारसंघातून टिळक कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शैलेश टिळक यांनी केली होती. या मतदारसंघातून शैलेश टिळक आणि त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांच्या नावांची भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे. कसबा पेठेतून माजी नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने आणि गणेश बिडकर यांचाही भाजपच्या उमेदवारीवर डोळा आहे.
चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे. मात्र अद्याप भाजपने उमेदवारी जाहीर केली नसताना लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांनी उमेदवारी अर्ज घेतला आणि उमेदवारीवर दावा ठोकला. भाजपच्या त्याच अधिकृत उमेदवार असतील अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्याचवेळी दिवंगत लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनी (Shankar Jagtap) उमेदवारी घेतल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीत शंकर जगतापांचे नाव आलेच नाही.
भाजपकडून दोन्ही मतदार संघाच्या उमेदवारांनी उमेदवारी घेतला आहे. त्यामुळे या दोघांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. मात्र महाविकास आघाडीत अजूनही रस्सीखेच सुरु आहे. त्यात आज अजित पवार इच्छूक उमेदवारांची भेट घेणार होते. त्याच्या मुलाखती घेणार होते. या सगळ्यापूर्वीच सकाळी नाना काटे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज घेतला होता. मुलाखती पूर्वीच उमेदवारी अर्ज घेतल्याने विविध चर्चा रंगल्या आहे. त्यात मी अजित पवार घेणार असलेल्या मुलाखतीला सामोरं जाणार असल्याचंही नाना काटे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय शिजत आहे? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.