(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll election : कसब्यात रासने, धंगेकरांमध्ये काटे की टक्कर! मतदानाच्या टक्केवारीनुसार कसब्य़ाचा गड कोण राखणार?
पुण्यात कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदर रविंद्र धंगेकर यांच्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली. कसब्यात एकूण 50.06 टक्के मतदान पार पडलं.
Pune Bypoll election : पुण्यात कसबा मतदार संघात (Pune Bypoll Election)भाजप उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदर रविंद्र धंगेकर यांच्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली. कसब्यात एकूण 50.06 टक्के मतदान पार पडलं. त्यानंतर अख्या पुण्यात एकच चर्चा रंगली की भावी आमदार नेमका कोण होणार? दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी त्यांचा आमदार विजयी असे बॅनर्सदेखील लावले. रासनेंच्या समर्थकांनी रासनेंचं भावी आमदार म्हणून अभिनंदन आणि धंगेकरांच्या समर्थकांनी धंगेकरांना भावी आमदार म्हणून जाहीर करुन टाकलं आहे. मात्र प्रभागानुसार आकडेवारीनुसार विजयाची गणितं ठरणार आहे.
कसब्याचे पूर्व-पश्चिम असे दोन भाग
कसब्यात प्रभाग क्रमांक 15,16,17,18,19 आणि 29 येतात. त्यात कसबा मतदार संघाचे कसबा पूर्व आणि कसबा पश्चिम असे दोन भाग आहेत. कसबा पूर्व विभागात 16,17,18,19 हे प्रभाग येतात. तर पश्चिम कसब्यात 15 आणि 29 हे दोन प्रभाग येतात. कसब्यात एकूण 50.06 टक्के मतदान झालं. पश्चिम भागात प्रभाग क्रमांक 15 मध्ये शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ शुक्रवार पेठेचा परिसर येतो. तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये नवी पेठ, दत्तवाडी आणि दांडेकर पुलाचा भाग येतो. प्रभाग 15 आणि 29 हा भाजप समर्थक प्रभाग मानला जातो. त्यामुळे या प्रभागात भाजपला जास्त मतं मिळण्याची शक्यता आहे. ब्राह्मण समाजाची नाराजी सोडली तर आतापर्यंत या प्रभागामधील नागरिक भाजपला पाठिंबा देत असल्याचं समोर आलं होतं.
त्यासोबतच कसबा पूर्व विभागात 16,17,18,19 या प्रभागात कॉंग्रेसचं वर्चस्व आहे, असं एकंदरीत बोललं जातं. या भागात कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर याचं वर्चस्व आहे. त्यांनी या प्रभागात अनेक वर्ष काम केलं आणि नगरसेवकही होते. त्यामुळे या प्रभागात रविंद्रं धंगेकरांना जास्त मतं मिळू शकतात. हे प्रभाग मागायवर्गीय आणि मुस्लीमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागात रविंद्र धंगेकरांना मानणारा वर्ग आहे. शिवाय या प्रभागात त्यांनी यापूर्वी मनसेकडूनही काम केलं आहे आणि काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील त्यांचा प्रचार केला होता. त्यामुळे या प्रभागात त्यांना जास्त मतं मिळण्याची शक्यता आहे.
2019 च्या तुलनेत मतदान कमी
कसबा मतदारसंघासाठी 2019 मध्ये 51.64 टक्के मतदान झालं होतं. यावेळी 50.06 टक्के मतदान झालं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 4,540 मतं कमी आहेत. त्यात लोकमान्य नगर आणि नवीपेठ परिसरात मागील वर्षीपेक्षा कमी मतदान झालं आहे. ही सगळी आकडेवारी पाहता कसब्यात नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कसबा पेठ मतदारसंघात कोणत्या समाजाची किती टक्के मतं?
- 31.45 टक्के मते ओ बी सीं ची मतं आहेत .
-23. 85 टक्के मतं मराठा आणि कुणबी समाजाची आहेत .
- 13 टक्के मतं ब्राम्हण समाजाची आहेत
-10.5 टक्के मतं मुस्लिम समाजाची आहेत .
- 9. 67 अनुसूचित जमातींची टक्के मतं आहेत
-7.11 टक्के मतं जैन आणि ख्रिश्चन समाज घटकांची मतं आहे.