(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune bypoll election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला? बावनकुळेंनी थेट घरी जाऊन घेतली 'या' व्यक्तीची भेट
खासदार गिरीश बापट निधनानंतर भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गौरव बापट यांची भेट घेतल्याने उमेदवारीची चर्चा रंगलीय.
Pune bypoll election : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवंगत गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या निधनानंतर भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्यात भाजपकडून काही नावांची चर्चा आहे. मात्र आता बावनकुळे यांनी गौरव बापट यांची भेट घेतल्याने बापट यांच्या घरीच उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या रंगू लागल्या आहेत.
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. सोबतच नियोजित बैठका देखील घेतल्या. त्या सगळ्या कार्यक्रमानंतर मात्र बावनकुळे यांनी थेट बापट यांचं घर गाठलं आणि गौरव बापट यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा उमेदवारीबाबत सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपकडून पाच नावं चर्चेत
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत. या पाच जणांपैकी भाजप एकाला उमेदवार म्हणून संधी देण्याची शक्यता आहे. या पाचही जणांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक नवीन प्रोजक्ट्स हाती घेतले आहेत. शिवाय त्यांनी पुण्यातील इतर विषयांवरदेखील केंद्रीय स्तरावर नाव कमवलं आहे. त्यामुळे यापैकी भाजप नेमकी कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कसबा निवडणुकीतून भाजप धडा घेणार?
आमदार मुक्ता टिळकांच्या निधनानंतर टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे टिळक कुटुंब नाराज झालं. याचा फटका भाजपला चांगलाच बसला. भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ब्राह्मण समाज नाराज झाला, परिणामी भाजपला होणारं मतदान कमी झालं. चुकीचा उमेदवार दिल्याने किंवा टिळकांच्या घरात उमेदवारी न दिल्याने भाजपला बालेकिल्ला गमवावा लागला. त्यामुळे आता बापटांच्या निधानानंतर भाजपला उमेदवार निवडीचं मोठं आव्हान असणार आहे. भाजपकडून उमेदवारांसाठीती चाचपणी सुरु झाली आहे. काही नावांची चर्चादेखील आहे. मात्र जर यंदा बापटांच्या घरात उमेदवारी दिली नाही तर पुन्हा एकदा पराभव होण्याची भीती भाजपला असण्याची शक्यता आहे.