मोठी बातमी! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी 2 वर्षांनंतर जामीन
भोसले यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ते दोषी नाहीत हे मानण्याची अनेक कारणे आहेत, याशिवाय, अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये भोसले यांना आधीच जामीन मंजूर झाला आहे.
पुणे : राज्यातील काही राजकीयन नेत्यांशी जवळीक असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाने बुधवारी आर्थिक गैरव्यवहाराच्या म्हणजे मनी लॉन्ड्रिंगप्रकरणातील गुन्ह्यातही जामीन मंजूर केला. भोसले यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या गुन्ह्यात ते दोषी असल्याचे पुराव्यांतून दिसून येत नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने त्यांना दिलासा देताना प्रामुख्याने नोंदवले. ईडीने 28 जून 2022 रोजी भोसले यांना अटक केली होती. त्यामुळे, अविनाश भोसले यांना 2 वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे.
भोसले यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ते दोषी नाहीत, हे मानण्याची अनेक कारणे आहेत, याशिवाय, अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये भोसले यांना आधीच जामीन मंजूर झाला आहे, असेही न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी भोसले यांची जामिनाची मागणी मान्य करताना प्रामुख्याने स्पष्ट केले. भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 26 मे 2022 रोजी अटक केली होती, त्यानंतर, याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने भोसले यांना अटक केली होती. सीबीआयने नोंदवलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयानेच त्यांना जामीन मंजूर केला होता.
अविनाश भोसले यांना अटक प्रकरण काय?
- येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून याआधी चौकशी
- 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले
- वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
- सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता
- बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश
- ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त.
दोन वर्षांनी सीबीआय कोर्टानेही दिला जामीन
येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयनं 2022 मध्ये केलेल्या अटकेपासून अविनाश भोसले जेलमध्येच होते. मुंबई सत्र न्यायालयानं गेल्यावर्षी जामीन फेटाळल्यानंतर अविनाश भोसले यांनी जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. हायकोर्टानं आपला राखून ठेवलेला निकाल यापूर्वीच जाहीर केला. अविनाश भोसले यांना परवानगीविना देशाबाहेर जाण्यास मनाई करत तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. काहीकाळापासून भोसले हे वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयातील जेलवॉर्डातच होते. येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयनं अविनाश भोसलेंना अटक केली होती. सुरूवातीला चार दिवसांच्या नजरकैदेनंतर त्यांना 10 दिवस तपासयंत्रणेच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश विशेष सीबीआय कोर्टानं दिले होते. याकाळात त्यांना सीबीआयची टीम चौकशीकरता दिल्लीलाही घेऊन गेली होती.