Pune Blast : पुणे सहरकारनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात स्फोट, एटीएसचा तपास सुरू
शनिवारी पुण्यातील सहकारनगरमध्ये एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात स्फोट झाला होता, या प्रकरणाचा एटीएस तपास करत आहे.
Pune Blast : पुण्यातील सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या (Pune blast) दुकानात सोमवारी पहाटे स्फोट झाला होता. यामध्ये दोन जण जखमी झाले होते. यावर आता एटीएसने तपास सुरू केला आहे. एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात एवढ्या मोठा ब्लास्ट कसा होऊ शकतो? असा संशय एटीएसला आहे. शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला आग लागू शकते, पण ब्लास्ट कसा झाला याचं उत्तर अद्याप अनुत्तरित आहे. त्यामुळे एटीएस आता या प्रकरणाचा तपास करणार आहे.
सातारा रस्त्यावर डी मार्ट जवळ मध्यरात्री 2 वाजता आग लागल्याची घटना घडली होती. तीन दुकानांना मोठी आग लागली होती. होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स, मोबाईल शॉपी अशी ती तीन दुकानं होती. यात गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या. या ठिकाणी आग लागून मोठा स्फोट झाल्याने सगळ्या वस्तू दुकांनांच्या बाहेर आणि आजुबाजूच्या परिसरात फेकल्या गेल्या होत्या.
भयंकर स्फोट
इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागल्याने मोठे स्फोट झाले. प्रचंड तीव्र स्फोट असल्याने दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. एक दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली होती. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. परिसर मोठा असल्याने ही आग विझवणं अग्निशमन दलाच्या जवानांसमोर मोठं आव्हान होतं. त्यासोबतच रुग्णवाहिकादेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यात दोन जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
दुकानांचं मोठं नुकसान
हा स्फोट एवढ्या मोठ्या प्रमाणाच झाला कसा?, असा संशय एटीएसला आहे. त्यामुळे एटीएसने या स्फोटाची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने तिन्ही दुकानं जळून खाक झाली होती. शिवाय दुकानांमध्ये महागड्या वस्तू होत्या. त्या वस्तुंचंदेखील मोठं नुकसान झालं आहे.यात जखमी झालेला एक व्यक्ती दुकानाचा मालक आहे. तिन्ही दुकान मालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अनेक परिसरात शॉर्ट सर्किटमुळे तर कधी अन्य कारणांमुळे आगीच्या घटना घडत आहे. मात्र ही आग फार मोठी असल्याने आणि संशयास्पद असल्याने या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे.