Pune Crime : दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन काटा काढला; बारामतीतील तीन जणांना अटक
Baramati Crime: मुलगा दारू पिऊन मारहाण करायचा म्हणून मजूर दाम्पत्याने गावातील एकाला पावने दोन लाखांची सुपारी देऊन त्याची हत्या केली.
पुणे, बारामती : बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून दारू पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मजूर दांपत्यसह सुपारी घेऊन खून करणाऱ्या तीन जणांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
एका अनोळखी युवकाचा खून करुन त्याचा मृतदेह दोरी आणि तारेने दगड बांधून बारामती तालुक्यातील शिर्सूफळ येथील पाण्याच्या तलावात फेकून देण्यात आला होता. 26 मे रोजी या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. बारामती पोलीस आरोपींचा शोध घेत होते.
याच दरम्यान पोलीसांना दौंड तालुक्यातील रावणगाव येथील कुटंबाबाबत माहिती मिळाली. पोपट भानुदास बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई पोपट बाराते आणि मुलगा सौरभ पोपट बाराते हे गावातून गेल्या तीन महीन्यापूर्वी अचानक गायब झाले होते. त्यानंतर 15 दिवसांनी केवळ बाराते दांपत्यच गावातील घरी परत आले होते. मुलगा सौरभ हा त्यांच्या सोबत आला नसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीसांनी शुक्रवारी पोपट बाराते आणि आणि पत्नी मुक्ताबाई याच्याकडे मुलगा सौरभच्या ठावठिकाण्याबाबत विचारणा केली. पोपट बाराते यांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. मला काही माहित नाही, माझ्या पत्नीला विचारा असे सांगितले. मुक्तबाई यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी यावर अधिकची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, मुलगा सौरभ मला दारु पिऊन येऊन मारहाण करायचा. मला आणि माझे पती पोपट यांना त्रास देत होता. त्यामुळे मुलगा सौरभला ठार मारण्यासाठी गावातील बबलू तानाजी पवार याला 1 लाख 75 हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्याने सौरभला ठार मारले.
मुक्ताबाईंच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी बबलू पवार याची आणि त्याच्या मित्रांची चौकशी केली. बबलूने त्याचे मित्र बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे, अक्षय चंद्रकांत पाडळे यांच्या मदतीने सौरभला ठार मारल्याची कबुली दिली. त्याचा मृतदेह शिर्सुफळ येथील तलावमध्ये दगड बांधून टाकून दिल्याचं देखील सांगितलं. त्यानंतर गुन्ह्यातील आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा :