Pune Accident news : अपघातग्रस्तांच्या मदतीला निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात; पुणे-नगर मार्गावर दोन अपघात, दोघांचा मृत्यू
अपघातग्रस्तांच्या मदतीला निघालेल्या रुग्णवाहिकेचा (Accident) अपघात झाला आहे. रुग्ण वाहिकेने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

Pune Accident news : पुणे-नगर महामार्गावर आज अपघातग्रस्तांच्या मदतीला निघालेल्या रुग्णवाहिकेचा (Accident) अपघात झाल्याची घटना घडली. रुग्णवाहिकेने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात रुग्णवाहिका चालक आणि त्याचा सहकारी दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुण्यातील कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट डिझायर आणि दुचाकीचा अपघात झाला होता. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. महेश गव्हाणे असं या तरुणाचं नाव होतं. या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका मदतीसाठी घटनास्थळी जायला निघाली होती. सणसवाडी गावच्या हद्दीत कल्पेश वनज फाट्याजवळ रुग्णवाहिकेचं चालकाकडून नियंत्रण सुटलं आणि रुग्णवाहिकेने थेट दुचाकीला धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिका चालक व त्याच्या शेजारील आणखी एकजण जखमी झाला आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वैभव डोईफोडे असं वाहन चालकाचं नाव आहे. श्रीकांत सुर्यकांत उबाळे असं मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव होतं. रुग्णवाहिका चालकासह त्याच्या शेजारी बसलेले अक्षय रविंद्र बनसोडे या अपघातात जखमी झाले आहेत.
दोन अपघातात दोन मृत्यूनं खळबळ
पुणे नगर मार्गावर दोन्ही अपघात झाले. या दोन्ही अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातामुळे खळबळ उडाली आहे. दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. या अपघाताच्या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेच्या अपघातात मृत्यू झाल्याने सगळीकडे दु:ख व्यक्त केलं जात आहे. नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
अपघातात मृत्यूचं प्रमाण अधिक
पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढत आहे. हा मार्ग मागील काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील काही दिवसात या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे हा मार्ग धोक्याचा आहे का?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यासोबतच या मार्गावरील अपघात मृत्यूंची संख्यादेखील जास्त आहे. त्यातच आज हे दोन विचित्र अपघात झाले आहेत. त्यात दोघांना जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही अपघातामुळे पुणे-नगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातामुळे नागरिकांनीदेखील गर्दी केली होती. काही वेळाने पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पुण्यात अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनादेखील राबवण्यात येत आहे. मात्र अपघाताचं प्रमाण कमी होताना दिसत नाही आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
