एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जेजुरीत प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर
सत्ता हस्तगत केल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे एमआयएमशी युती केल्याने त्याचा अपप्रचार केला जातोय, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी बहुनज वंचित विकास आघाडीवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.
पुणे : विधानसभा आणि लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, राज्यात राजकीय समीकरणं जुळवण्यास सुरुवातही झालीय. अशात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत जात, बहुजन वंचित विकास आघाडी स्थापन केलीय. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लागला आहे. दुसरीकडे, शेतकरी नेत्यांमधील महत्त्वाचे नेते खासदार राजू शेट्टी हे गेल्या काही महिन्यात काँग्रेसच्या जवळ जाताना दिसले. अशा वातावरणात अॅड. प्रकाश आंबेडकर आणि खासदार राजू शेट्टी हे जेजुरीतील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. आगामी काळात प्रभावी ठरणारे असे दोन नेते एकाच व्यासपीठावर आल्याने अर्थात राजकीय वर्तुळात चर्चांनाही सुरुवात झाली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या भाषणातून भूमिकाही स्पष्ट केली.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
सत्ता हस्तगत केल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे एमआयएमशी युती केल्याने त्याचा अपप्रचार केला जातोय, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी बहुनज वंचित विकास आघाडीवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.
कुपोषण थांबलेले नाही, आदिवासी भागात मुलं दगावत आहेत, धान्य गोदामात भरले आहे, मात्र ते धान्य सडून गेले तरी चालेल पण ते कुपोषणीत कुटुंबाला आम्ही ते धान्य देणार नाही, असे सध्याच्या सरकारचे ब्रिद वाक्य झाले आहे, मग ते सरकार काँग्रेस, शिवसेना किंवा भाजपचे असो, असे म्हणत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “तव्यावरील भाकरी पलटली पाहिजे. पण ती पलटताना वंचितांच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजे, हे लक्षात ठेवा. नाहीतर ही सत्ता नेहमीप्रमाणे या कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे जातेय. त्यामुळे वंचितानी एकत्र येउन भाकरी पलटली पाहिजे.”
“बारामतीमध्ये घोषित केलं, आरक्षण देऊ, पण ते कुठे गेलं? टाटा इंस्टीट्युटमार्फत धनगरांचे आरक्षण संपवले, अशी आजची परिस्थिती आहे. अहवाल तुमच्या विरोधात आला, आता आम्ही काहीच करु शकत नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे आम्ही सांगतोय की आपण सत्ता घेऊ व आपले आपणच ठरवू.”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राजू शेट्टी काय म्हणाले?
“धनगर समाजासह अनेक समाजांना न्याय मिळेल, असे 2014 साली वाटत होते. जे संघर्ष करत होते, त्यांना न्याय मिळेल अशी आशा होती. हे वाटण्यामागे गोपीनाथ मुंडे यांचा आश्वासक चेहरा होता. सत्तांतर झाले, पण हे पाहण्यासाठी गोपीनाथ मुंडे या जगामध्ये राहिले नाहीत. मुंडे यांचा अपघातात मृत्यू झाली की घातपात झाला, हेही अजून कळलेलं नाही. यात शंका घ्यायला अनेक ठिकाणी वाव आहे.”, असे जाहीरपणे राजू शेट्टी म्हणाले.
“सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत महागठबंधन करावं हीच भूमिका प्रकाश आंबेडकर यांचीही आहे. आंबेडकर यांच्या प्रस्तावाबाबत राहुल गांधींना भेटणार असून, छोट्या पक्षांची गळचेपी होऊ नये हा आग्रह आहे.”, असे राजू शेट्टी म्हणाले.
देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केलीय. त्यामुळे या सरकारचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह शक्य तितक्या पक्षांना एकत्र आणण्याची आपली भूमिका आहे. कॉंग्रेससोबत येण्याबाबत प्रकाश आंबेडकर हे सकारात्मक असून त्यांनी दिलेल्या प्रस्तावाबाबत कॉंग्रेसची भूमिका जाणून घेण्यासाठी आपण राहुल गांधी यांची भेट असून, किमान समान कार्यक्रमावर आधारीत आघाडी व्हावी आणि लहान पक्षांवर अन्याय होऊ नये ही आपली भूमिका असल्याचंही राजू शेट्टींनी स्पष्ट केलं.
धनगर आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं राज्य सरकारकडे बोट दाखवलंय. राज्य सरकारनं सुस्पष्ट प्रस्ताव देणं गरजेचं असताना चालढकल चालवल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement