वानवडीत मृत्यू झालेल्या युवतीचा लॅपटॉप जमा करा, पुणे पोलिसांची भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस
परळीतील युवतीच्या पुण्यातील वानवडी भागात झालेल्या मृत्यूनंतर तिचा लॅपटॉप भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी चोरल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी धनराज घोगरे यांना नोटीस बजावून लॅपटॉप जमा करण्यास सांगण्यात आलं आहे.
पुणे : परळीतील युवतीच्या पुण्यातील वानवडी भागात झालेल्या मृत्यूनंतर तिचा लॅपटॉप भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे यांनी चोरल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यासाठी नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस बजावून लॅपटॉप जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र धनराज घोगरे यांच्याकडे लॅपटॉप नसून त्यांना विनाकारण त्रास देऊ नये, असं भाजप नेत्यांच म्हणणं आहे. त्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ आणि इतर नेते नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासह वानवडी पोलिसांना भेटून निवेदन दिलं.
धनराज घोगरे यांनी लॅपटॉप चोरला नसून पोलीस त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आणि घोगरेंवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. पोलीस आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असले तरी आपण घाबरणार नाही, असं नगरसेवक घोगरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेची भाजप नगरसेवकाविरोधात तक्रार शिवसेनेच्या बीड महिला जिल्हाप्रमुख संगीत चव्हाण यांनी तरुणीच्या मृत्यू प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. तिच्या मृत्यूनंतर पुण्यातले भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी तिच्या घरात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन लॅपटॉप आणि मोबाईल घेतला आणि त्यातील फोटो, ऑडिओ-व्हिडीओ व्हायरल केले असा गंभीर आरोप संगीता चव्हाण यांनी केला आहे. संगीता चव्हाण यांनी तशी तक्रार बीडमध्ये पोलीस ठाण्यात दिली आहे.
काय आहे प्रकरण? मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या 22 वर्षीय मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात आली होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली होती. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच तरुणी आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.