पोलीस भरती झाल्याचं पत्र आलं, पण नियुक्ती नाही, बारामतीमध्ये करतायेत डिलिव्हरी बॉयचं काम
स्पर्धा जास्त असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. काहींना यशही येते. पण लातूर आणि सोलापूरमधील दोन तरुणांना पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊनही, राज्य सरकारच्या ढिसार कारभारामुळे डिलिव्हरी बॉयचं काम करावे लागतेय.
बारामती : पोलीस (police) दलात सामील होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून तरुण प्रयत्न करत असतात. पण स्पर्धा जास्त असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. काहींना यशही येते. पण लातूर (Latur) आणि सोलापूरमधील (Solapur) दोन तरुणांना पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊनही, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे डिलिव्हरी बॉयचं (delivery boy) काम करावे लागतेय. नेमकं प्रकरण काय आहे, त्याबाबत जाणून घेऊयातत...
2021/22 ची पोलीस भरती प्रकिया 2023 मध्ये झाली. पोलीस भरतीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली प्रतीक्षा यादीत नाव देखील आलं. परंतु सरकारकडून अद्यापपर्यंत कोणताही कॉल न आल्यामुळे मुलांना झोमॅटो कंपनी डिलिव्हरी बॉयचे काम करावे लागते. निलेश पाटील आणि दत्तात्रय गुट्टे ही सोलापूर व लातूर जिल्ह्यातील मुले बारामतीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे काम करत आहेत.
आस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत शेतकरी आपल्या मुलांना शिकवतो. बारावी झाली की मुलं पोलीस भरतीची तयारी सुरु करतात. काहींना यश येतं किंवा काही जण निराश होऊन वेगळी वाट चोखाळतात. आता उच्च शिक्षित तरुण देखील या पोलीस भरतीची तयारी करतात. सोलापूर जिल्ह्यातला निलेश आणि लातूरचा दत्तात्रय गुट्टे दोघे पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण करून सध्या बारामती डिलिव्हरी बॉयचे काम करतात. निलेशला तर मुंबईत शहर पदासाठी निवड झाल्याचे पत्र देखील आले आहे. राज्य सरकारने 2021/22 साली दहा हजार पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. परंतु वास्तवात भरती झाली 2023 मध्ये झाली. दहा हजार पैकी 7076 पदे भरली गेली. 8970 मुले/ मुली परंतु प्रतीक्षा यादीत आहेत. सध्या मुंबईत तीन हजार पदे रिक्त आहेत. सगळी प्रक्रिया होऊन देखील अद्याप पर्यंत सरकारकडून कोणताही कॉल आलेला नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करावे लागतेय.
या संदर्भात मुलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता लवकरच भरती होईल असं सांगण्यात आले. तर जोपर्यंत सरकारकडून आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही पदे भरू शकणार नसल्याचं मुंबई पोलीस आयुक्तांचे म्हणणे असल्याचे मुले सांगतात. 7076 पैकी फक्त आतापर्यंत फक्त 1500 मुले आणि मुली बोलवले असल्याचे निलेश सांगतो.
आम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आम्हाला आर्थिक परिस्थिती मुळे काम करावं लागलं. घरी देखील जाता येत नाही.. घरी गेल तर घरचे आणि गावातील लोकं म्हणतात तुम्ही तर भरती झाला आहात इथे काय करतात. त्यामुळे ही मुले घरी देखील जात नाहीत.
राज्यात झालेल्या या पेपर फुटी मधील अनेक जण हे पोलीस मध्ये भरती झाल्याचं या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. जर भरती पेपर फुटी झाली नसती तर आम्ही प्रतीक्षा यादीत आलोच नसत असं या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. सरकारने आम्हाला लटकवत ठेवले आहे. जर आम्ही भरती झालो आहोत तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला घेणार आहोत म्हणून नाहीतर सरळ नाही म्हणून सांगा. आम्ही दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करतो परंतु सरकार आम्हाला काहीच सांगत नाही असं दत्तात्रय म्हणतो.