Pune Metro inaugurate: अखेर आज पुण्याच्या मेट्रोचं होणार लोकार्पण! PM मोदी ऑनलाईन दाखवणार झेंडा, मेट्रोसोबतच 'या' विकासकामांचे होणार उद्घाटन
Pune Metro inaugurate: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. 26 सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता.
पुणे: पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे लोकार्पण आज रविवारी (29 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन पध्दतीने हे उद्घाटन करण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. केंद्राच्या पातळीवर वरिष्ठ नेत्यांबरोबर गुरुवारी दिवसभर चर्चा झाल्यानंतर आज (रविवारी) पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने होकार कळवला होता. आज ऑनलाईन माध्यमातून हे उद्घाटन रविवारी 29 सप्टेंबरला होणार आहे.(Pune Metro inaugurate)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार (Pune Metro inaugurate) आहेत. 26 सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. आज दुपारी पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत राहून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण करणार आहेत. सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. ज्याला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत राहणार आहेत.(Pune Metro inaugurate)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे, मात्र ते देखील आज ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. त्यामध्ये जिल्हा सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट - कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा याचे भूमिपूजन करण्यात येईल. सोलापूर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.(Pune Metro inaugurate)
कुठल्या विकासकामांचे होणार मोदींच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन
- जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासी सेवेचा शुभारंभ
- स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन
- सोलापूर विमानतळाचे उद्घाटन
- भिडे वाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन
- राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित
मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न
विरोधकांनी मोदींचा दौरा रद्द झाला म्हणून सत्ताधारी नेत्यावर हल्लाबोल केला, त्याचबरोबर मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र, लोकार्पणसाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप केला, याविरोधात मविआचे नेते संतप्त झाले आहेत, त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, तर लाल फित कापत त्यांनी लोकार्पण केलं असून आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार म्हणत आक्रमक झाले होते.