मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला अन् तासाभरात त्याने लोहमार्ग गाठलं, देहूरोडमध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडलगतच्या देहूरोडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. रेल्वेसमोर येऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडलगतच्या देहूरोडमध्ये (Dehu Road) धक्कादायक घटना घडली आहे. दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केल्याचं समोर आलं आहे. रेल्वेसमोर येऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी 30 ऑगस्टच्या रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्याने मित्राला मोबाईलवर मेसेज पाठवत आपण आत्महत्या करत असल्याचं कळवलं अन त्यानंतर तासाभरात त्याचा मृतदेह लोहमार्गालगत आढळला. आत्महत्येचं मूळ कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.
देव कुमार असं या पंधरा वर्षीय मुलाचं नाव होतं. तो देहूरोडच्या लष्करातील एएसआय अधिकाऱ्याचा मुलगा होता. देवला मोबाईल गेमिंगचा ही छंद होता, त्यातून तो अनेक चॅलेंज ही स्वीकारायचं अशी माहिती त्याच्या मोठ्या भावाने रेल्वे पोलिसांना दिली.
धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन जीव दिला
देव कुमारचं कुटुंब हे मूळचं मथुरा येथील आहे. त्याची आई कामानिमित्त मथुऱ्याला गेली होती, वडील ड्युटीवर होते. तर दोन्ही भाऊ घरात होते. त्यावेळी देवने मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला अन् पुढच्या तासाभरात त्याने लोहमार्ग गाठलं. धावत्या रेल्वेसमोर येऊन त्याने जीव दिला. देवने आत्महत्या का केली, याचं मूळ कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्या कारणाचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. रेल्वे पोलिसांनी देवचा मृतदेह कुटुंबीयांकडे दिल्यानंतर ते पुढील विधींसाठी मथुऱ्याला गेले आहेत.
विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने शिक्षकाची आत्महत्या
विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी दौंडमध्ये घडली होती. प्राथमिक शाळेतील दहापैकी 9 विद्यार्थ्यांनी जवळच्या दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतल्याने 46 वर्षीय शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. अरविंद देवकर असे शिक्षकाचे नाव आहे. दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. या शिक्षकाने शाळेतील विद्यार्थ्यांना साफसफाईची कामं करायला सांगितल्याने, पालकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत टाकले. त्यामुळे शिक्षकाला याचा पश्चाताप झाला आणि त्या निराशेतूनच शिक्षकाने शाळेत तणनाशक प्यायले. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकाला उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांनंतर पुण्यातील हडपसर इथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान देवकर यांचा मृत्यू झाला. आत्महत्या केलेल्या शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा
Aurangabad : 'ताई, मला माफ कर' रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने बहिणीच्या घरी घेतला गळफास