Pimpri Crime : महिलेसमोर जमिनीवर नाक घासायला लावलं, अपमान सहन न झाल्याने तरुणाचा गळफास
गैरसमजातून चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्याच वेळी त्याला महिलेसमोर जमिनीवर नाक ही घासायला लावलं. परंतु हा अपमान सहन न झाल्याने सचिन तळेकरने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एका 29 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काही जणांनी या तरुणाला महिलेसमोर जमिनीवर नाक घासायला लावलं होतं. परंतु हा अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. दिघई परिसरात 17 एप्रिल रोजी ही घटना घडली. सचिन सोपान तळेकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना डुडुळगाव इथे घडली.
या तरुणाने एका महिलेबाबत चुकीचं वक्तव्य केल्याचा समज झाला. मात्र या गैरसमजातून चौघांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. त्याच वेळी या चौघांनी तरुणाला महिलेसमोर जमिनीवर नाक ही घासायला लावलं. परंतु हा अपमान सहन न झाल्याने सचिन तळेकरने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबा मोठा धक्का बसला आहे.
सचिन तळेकर महापालिकेच्या शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. आरोपींच्या एका नातेवाईक महिलेला महापालिकेत कामाला राहायचं होतं. यासंदर्भात तिने सचिन तळेकर याच्याशी संपर्क साधला होता. तीन चार जण भेटायला येत असल्याचं तिने सांग काही कागदपत्रे तिने सचिनला फोनवरुन कळवलं. मात्र मला फक्त तुम्हालाच भेटायचं आहे, असं सचिन म्हणाला आणि या वाक्यावरुन गैरसमज झाला. यानंतर चौघांनी सचिन तळेकरला
बेदम मारहाण केली. शिवाय महिलेसमोरच त्याला नाक घासायला लावलं.
आत्महत्येनंतर मारहाण करणाऱ्या चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यांची नावं देखील समोर आली आहेत. या प्रकरणी किरण रामदास कान्हूरकर, विजय दत्तात्रय तापकीर, अमोल बाळासाहेब तापकीर आणि अभिनव अर्जुन गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दिघी पोलीस अधिकचा तपास करत आहेत. मात्र या आत्महत्येच्या घटनेने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या