Pune Crime News: पाणीपुरीचे पैसे मागितल्यानं तिघांनी केली विक्रेत्याला मारहाण; तिघेही अटकेत
पाणीपुरीसाठी पैसे मागितल्याने तिघांनी पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण करत त्याच्या स्टॉलची तोडफोड केली. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली.
Pune Crime News: पाणीपुरीसाठी पैसे मागितल्याने तिघांनी पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण करत त्याच्या स्टॉलची तोडफोड केली. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली. आरोपींनी 1500 रुपये लुटून रस्त्यावर दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वैभव राजाभाऊ तरंगे (19), तुषार अनिल अडागळे (18) आणि प्रताप बाळू लोंढे (21, सर्व रा. उरुळी कांचन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बत्तीस वर्षीय पाणीपुरी विक्रेता अनिल राठोड यांनी पुणे शहर पोलिसांतर्गत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
राठोड हे उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात पाणीपुरी विक्रीची व्हॅन चालवतात. आरोपी वैभव, तुषार आणि प्रताप यांनी राठोड यांच्या स्टॉलवर पाणीपुरी खाल्ली. राठोड यांनी पाणीपुरीसाठी पैशांची मागणी केली, मात्र तिघांनी स्वत:ला परिसरातील ‘भाई’ म्हणवून घेत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी राठोड यांना बांबूच्या काठीने मारहाण केली, अशी महिती पोलिसांनी दिली आहे. तिघांनी पाणीपुरीच्या स्टॉलची तोडफोड करून दहशत निर्माण केली आणि रोकड लुटून पळ काढला. या मारहाणीत राठोड जखमी झाले. पळून गेलेल्या तिघांना पोलिसांनी पकडले.
तृतीयपंथीयांना केली होती मारहाण
कन्टेंन्ट क्रिएटर विजया गावडे या सोशल मीडियासाठी एक व्हिडियो बनवतात. ज्या व्हिडियोत ट्रान्सजेंडर समुदायाद्वारे पाळल्या जाणार्या काही विचित्र विधींचे वर्णन करत होत्या. मात्र एका तृतीयपंथीला व्हिडिओचा राग आल्याने तृतीयपंथीयांनी विजया यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला होता
शिवलक्ष्मी झाल्टे या तृतीयपंथी महिलेला व्हिडिओ आक्षेपार्ह वाटला. तृतीयपंथी समाजाची थट्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सुमारे तीन महिन्यांपूर्वी शिवलक्ष्मी झालटे यांनी नाशिकमध्ये गावडे यांच्या विरोधात 2019 च्या ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे गावडेला ताब्यात घेण्यात आले होते आणि जामिनावर सुटका करण्यात आली होती. विजया गावडे या मूळच्या बारामतीच्या रहिवासी असून त्यांवी झालटे यांनी शिक्षा करण्याची धमकी दिल्यानंतर यापूर्वी माफी मागितली होती. झालटे यांनी रेकॉर्ड करून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये गावडे यांनी नंतर माफी मागितली होती.