Pune G-20 : जी-20 च्या परिषदेसाठी युद्धपातळीवर कामे पूर्ण करा; महापालिका आयुक्तांचे आदेश
Pune G-20 : पुण्यात जी-20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने शहरात वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी सुरु आहे. वेळेत कामं पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.
![Pune G-20 : जी-20 च्या परिषदेसाठी युद्धपातळीवर कामे पूर्ण करा; महापालिका आयुक्तांचे आदेश Orders from the Municipal Commissioner to complete all work for G-20 council Pune G-20 : जी-20 च्या परिषदेसाठी युद्धपातळीवर कामे पूर्ण करा; महापालिका आयुक्तांचे आदेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/49cc5dacd56355f08ffa7d2ef61324631672896898656442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune G-20 : पुण्यात जी-20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने शहरात वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी सुरु आहे. वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी काही मार्गावर सुशोभीकरण करण्यात येत आहे. रस्ते आणि पादचारी रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे. त्यासोबतच रस्त्यांवरील दिव्यांची पाहणी केली जात आहे. काही अंतराच्या कामासाठी नोडल अधिकारी नेमला आहे. त्यासोबतच यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.
जी-20 समूहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण अफ्रिका, तुर्की, इंग्लंड, अमेरिका आणि युरोपीय महासंघाचा समावेश आहे. येत्या सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या जी-20 परिषदेत 37 राष्ट्रांचे प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहे. त्यामुळे विमानतळापासून ते सेनापती बापट रोडवरील जे. डब्लू. मेरिएट हॉटेलपर्यंतचा परिसर सुशोभित करण्यात येत आहे. या मार्गावरील रस्ते, पदपथांची दुरुस्ती, चौक तसेच वाहतूक बेटांचे सुशोभिकरण, पथदिव्यांची दुरुस्ती, भिंतींची रंगरंगोटी करण्यात येत आहे. ही सगळी कामं 10 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.
मेट्रो मार्गही चकाकणार...
यासोबतच महामेट्रो आणि पीएमआरडीएच्या अधिकार्यांसोबतही आज बैठक घेण्यात आली आहे. शहरात अनेक परिसरात मेट्रोचं काम सुरु आहे. त्या मार्गावरील पेटिंग, बॅरिगेडवर लोगो लावण्याचं काम करण्यात येत आहे. मेट्रो प्रशासनाला जी कामं करणं शक्य नाहीत. त्या कामांची यादी मागवली आहे.
लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम
G-20 परिषदेमध्ये नागरी सहभाग वाढवण्यासाठी परिषदेपूर्वी सायक्लोथॉन, वॉल्केथॉन, शहर स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे कुमार यांनी सांगितलं आहे. जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
ड्रोन चित्रीकरणाला बंदी
पुणे शहर पोलिसांनी सेनापती बापट रोड आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2 किलोमीटरच्या परिसरात 10 ते 20 जानेवारी दरम्यान ड्रोन कॅमेरा वापरण्यावर बंदी केली आहे. 16 आणि 17 जानेवारी जी-20 च्या परिषदेनिमित्त हे निर्बंध लावण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) राजा रामास्वामी यांनी आदेश जारी केले आहेत. त्यात त्यांनी निर्बंध लावण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. 29 देशांचे सुमारे 200 प्रतिनिधी आणि 15 आंतरराष्ट्रीय संस्था शहरातील G20 बैठकींना उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)