Coronavirus | पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला, राज्यातील आकडा 33 वर
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहोचली आहे. एका कोरोना संशयित व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 14 मार्च या व्यक्तीची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. सध्या रुग्णाची प्रकृती स्थीर असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती.
आज एकूण 9 संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट्स आले. यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर इतर आठ अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. हे सर्व 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान दुबई आणि जपानचा प्रवास करून आले आहेत. तर 14 मार्चला यांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याव्यतिरिक्त अन्य 11 संशयित रुग्णांचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. यांच्यावर भोसरी येथील महापालिकेच्या नव्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही जमावबंदी लागू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव दिल्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माहिती दिली आहे.
गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पुणेकरांना करण्यात आलं आहे. याशिवाय पुण्यात आजपासून मॉलमधील फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकानंच सुरु राहणार आहेत. तर 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 33 वर
- पुणे - 16
- मुंबई - 5
- ठाणे - 1
- कल्याण- 1
- नवी मुंबई - 1
- पनवेल - 1
- नागपूर - 4
- अहमदनगर - 1
- यवतमाळ -2
- औरंगाबाद - 1
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर
- महाराष्ट्र -33
- केरळ - 22
- पंजाब - 1
- दिल्ली - 7
- जम्मू कश्मीर - 2
- लडाख - 3
- राजस्थान - 4
- उत्तरप्रदेश - 11
- कर्नाटक - 6
- तामिळनाडू - 1
- तेलंगाना - 3
- हरयाणा - 14
- आंध्रप्रदेश - 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
कोरोनाच्या राज्यातील सद्यस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज फोनवरुन चर्चा झाली. एएनआयच्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचा आढावा घेतला. तसेच सुरक्षेचे काय उपाय योजता येतील याविषयीही चर्चा केली.
एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंतीएपीएससीच्या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी एकत्र जमतात. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी एमपीएससीची परीक्षाची रद्द करण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्यात येणार आहे. ही परीक्षा 30 मार्चनंतर घेण्यात यावी असं सुचवण्यात येत आहे. तसेच घरगुती, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम थांबवण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
VIDEO | पुणे विभागीय आयुक्तांची आणि जिल्हाधिकारी यांची पत्रकार परिषद
संबंधित बातम्या :