Vaishnavi Hagawane death: वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार? ना हगवणे, ना कस्पटे, बाळ नेमकं कुणाकडे?
Vaishnavi Hagawane death : पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या बंदूकधारी निलेश चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही, त्यामुळं तुम्ही इथून चालते व्हा, असा दम त्याने भरला.

पुणे: वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिचं नऊ महिन्यांचं लेकरु नेमकं कोणाकडे आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे, त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना भेटत नाहीये. पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या बंदूकधारी निलेश चव्हाणकडे हे बाळ आहे, अशी माहिती काल (बुधवारी) समोर आली होती. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही, त्यामुळं तुम्ही इथून चालते व्हा, असा दम त्याने भरला. विशेष म्हणजे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणेंचे मोठे भाऊ जयप्रकाश हगवणे हे कस्पटे कुटुंबियांसोबत असताना ही निलेश चव्हाणने बाळाचा ताबा देण्यास नकार दिला. हा निलेश वैष्णवीचे पती शशांक हगवणेचा मित्र असण्याची शक्यता कस्पटे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. आज (गुरूवारी) वैष्णवीच्या माहेरचे त्या बाळाला आणायला गेल्यानंतर ते बाळ तिथं नसल्याची माहिती समोर आली आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी काय माहिती दिली?
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, माझा भाऊ मोहन, माझा मुलगा विराज आणि माझे दाजी उत्तम बहिरट हे तिघेजण बाळाला आणायला गेले होते, आता मला तिथून फोन आला होता. तिथं बाळ दिसत नाही. ते पिरंगुटच्या इकडे असण्याची शक्यता असल्याची माहिती माझ्या भावाने दिली आहे. काल बाळ आणायला गेल्यावर (बुधवारी) त्याने आम्हाला बंदूक दाखवली होती, त्यानंतर बातम्या आल्या. त्यामुळे तो फरार झाला, जर आम्हाला बाळ नाही मिळाला तर आम्ही कोर्टात जाणार आहे अशी माहिती वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी दिली आहे.
महिला आयोगाची पोस्ट
बाळाला वैष्णवीच्या माहेरच्यांना सोपवण्याबाबत आज महिला आयोगाने माहिती दिली आहे. "वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताबा आज वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात येईल. हगवणे कुटुंबातील 3 आरोपी अटक आणि 2 फरार असताना वैष्णवी यांचे 10 महिन्यांचे बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे होते. आज कायदेशीर मार्गाने जात सर्व प्रक्रिया पूर्ण करून या बाळाचा ताबा वैष्णवी यांच्या आई वडिलांकडे देण्यात येणार आहे", अशी माहिती महिला आयोगाने दिली आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताबा आज वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात येईल.
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) May 22, 2025
हगवणे कुटुंबातील ३ आरोपी अटक आणि २ फरार असताना वैष्णवी यांचे १० महिन्यांचे बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे होते...
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांना बाळ कस्पटेंकडे सोपवण्याच्या सूचेना केल्या आहेत. वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील यांना कस्पटेंच्या घरी जाऊन बाळ सोडवायला सांगितल आहे.
निलेश चव्हाण याच्या घराचा दरवाजा बंद
कायदा देखील हे वैष्णवीचं बाळ एकतर कस्पटे किंवा हगवणे कुटूंबाकडे असायला हवं असं सांगतो. आता हगवणे कुटूंबातील सदस्य अटक आहेत किंवा फरार आहेत. त्यामुळे आता एका तिसऱ्याच कुटूंबाकडे बाळाचा ताबा असल्याने वैष्णवीचे काका मोहन कस्पटे आले होते. त्या ठिकाणी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते पुन्हा आज एकदा पोलिसांकडे जाणार आहेत. बाळ निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती राजेंद्र हगवणेंच्या भावाने दिली होती. बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्पटे कुटूंबाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. आई कायमची सोडून गेली त्यानंतर आता त्या नऊ महिन्याच्या बाळाची परवड होत असल्याचं दिसून येत आहे.

























