Sinhagad Fort Pune: ...म्हणून सिंहगडावर नवे पर्यटक रस्ता भटकतात!
पावसामुळे निसरडे झालेले खडक व खडीवरून घसरून पर्यटक जखमी होण्याच्या घटना वाढत आहे. तसंच रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
Sinhagad Fort Pune: आतकरवाडी येथून सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad fort trek) जाणाऱ्या पायवाटेने वर जाताना आणि खाली येताना अनेक नवीन पर्यटक रस्ता चुकत आहे. या मार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने हा प्रकार घडत आहे. तसंच अनेक ठिकाणी समोर दोन रस्ते दिसत असल्यानं पर्यटक (Tourist) चुकून अवघड मार्गाची निवड करत आहेत. त्यामुळे पावसामुळे निसरडे झालेले खडक व खडीवरून घसरून पर्यटक जखमी होण्याच्या घटना वाढत आहे. तसंच रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
आतकरवाडीपासून सिंहगडावर पायी जाण्यासाठी अडीच किलोमीटरची पायवाट आहे. या पायवाटेवर पावसाचे पाणी वाहून गेल्याने अनेक ठिकाणी खडक उघडे पडले आहेत. गडावर पहिल्यांदा चालत आलेले पर्यटक रस्ता चुकून घनदाट जंगलात भटकताना किंवा अत्यंत धोकादायक कड्याकडे जाताना पाण्याने तयार झालेल्या चिखलातून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक तरुण पर्यटक जखमी होतात. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने फूटपाथवर दिशादर्शक फलक लावावे, रात्रीच्या वेळी रस्ता दिसण्यासाठी पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी नियमित ट्रेकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.
किल्ल्यावर नियमित येणाऱ्यांना रस्ता माहीत असल्याने त्यांना कोणतीही अडचण येत नाही, पण जे पहिल्यांदाच येतात त्यांना पुढचे दोन रस्ते चुकतात. काही रस्ते अतिशय खोल दरीच्या बाजूला आहेत तर काही खडी. अशा ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते, असं कायम ट्रेक करत असलेल्या तरुणांनी सांगितलं आहे.
नव्या ट्रेकरला अपघाताचा धोका
सिंहगडावर रोज अनेक नवीन ट्रेकर ट्रेक करतात. ते दिशादर्शकाचा वापर करत मार्ग निवडतात. मात्र गडावर फलकच नसल्याने नवे ट्रेकर वाट भटकत आहेत. काही दिवसांपुर्वीच सिंहगडावरी कल्याण दरवाज्याजवळ दरड कोसळ्याने एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. मात्र आता फलक नसल्याने प्रशासनाने लवकरात लवकर फलक लावावे, अशी मागणी ट्रेकर कडून केली जात आहे.
रस्त्यांची पाहणी केली जाईल आणि आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक तातडीने लावले जातील. रोड लाइटच्या व्यवस्थेबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. रात्रीच्या वेळी गडावर येणाऱ्या-जाणाऱ्यांनी बॅटरीचा वापर करावा, असे खानापूर वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके यांनी सांगितले.