NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड सापडला, पुण्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णीला अटक, CBI ची मोठी कारवाई
NEET Paper Leak : पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या संपर्कात असलेल्या पी व्ही कुलकर्णीला सीबीआयने लातूरमधून ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : नीट पेपरफुटीच्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या पेपरफुटीचा मास्टरमाईंड सीबीआयच्या ताब्यात आला असून पी व्ही कुलकर्णी असं त्याचं नाव आहे. सीबीआयने कुलकर्णीला लातूरमधून ताब्यात घेतलं असून तो एनटीएशी संबंधित असल्याचंही समोर आलं आहे. 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याचं समोर आल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
नीट पेपरफुटीच्या प्रकरणात आतापर्यंत अनेकजणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पण त्याचा मास्टरमाईंड आता सीबीआयच्या ताब्यात आला आहे. पी व्ही कुलकर्णी हा पुण्यात केमेस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून काम करायचा अशी माहिती समोर आली आहे. कुलकर्णी हा एनटीएशी संबंधित असून त्यानेच पेपर फोडल्याची माहिती आहे.
NEET Paper Leak Pune Connection : पुण्यातील धागेदोरे, लातूरमध्ये कारवाई
नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर आता लातूरही सातत्यानं सीबीआयच्या रडारवर आहे. दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये झालेल्या तपास आणि चौकशीनंतर पी व्ही कुलकर्णीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
कुलकर्णी हा चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाला असल्याची माहिती आहे. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या तो संपर्कात असल्याचंही समोर आलं आहे. याच धाग्यावरून सीबीआयचे पथक लातूरपर्यंत पोहोचले. त्यानंतर कुलकर्णीची सखोल चौकशी करण्यात आली.
लातूरच्या कैलासनगर मधील कुलकर्णीच्या घराला सध्या कुलूप असून त्याचे कुटुंब पुण्यात राहत असल्याची माहिती आहे. सीबीआयचे दुसरे पथक अद्याप लातूरमध्ये ठाण मांडून आहे. दरम्यान, लातूरमधील सुतमील परिसरातील खासगी क्लास चालकाच्या घरी सीबीआयनं 11 तास तपासणी केली. यावेळी क्लास चालकाच्या घरातून काही कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत.
Re NEET Paper Date : 21 मे रोजी पुन्हा परीक्षा
या आधी 3 मे रोजी झालेल्या नीटला पेपरफुटीचं ग्रहण लागल्यानं जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं. त्यामुळे आता केंद्र सरकारनं 21 जून रोजी पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. रद्द झालेल्या परीक्षेचं शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जाणार असून नव्यानं होणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसंच विद्यार्थ्यांना कोणतंही परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार असल्याचं केंद्रीय शिक्षमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. तसेच पुढील वर्षापासून नीट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
ही बातमी वाचा :
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?





















