एकनाथ शिंदे, अजित पवारांना भाजपाच्या चिन्हावर लढावं लागेल - रोहित पवार
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल लिहून ठेवा, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. ते बारामती येथे बोलत होते.
पुणे : भाजपला लोकनेते आवडत नाहीत. भाजपने अनेक लोकांची ताकद कमी केली, त्यांच्याच नेत्यांची ताकद कमी केली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल लिहून ठेवा, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. ते बारामती येथे बोलत होते.
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शनाची पाहणी आमदार रोहित पवारांनी केली. 18 ते 22 दरम्यान कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शन होणार आहे. या कृषी प्रदर्शनाला राज्यभरातून लोक येत असतात. ज्या प्रमाणे शेतकरी येत असतात त्याच प्रमाणे राजकिय नेते देखील येत असतात आज रोहित पवारांनी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना इथे नवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. उत्पन्न दुप्पट करायचा प्रयोग इथं होत आहे. पाण्याचं व्यवस्थापन करायचं, असं झालं तर दुष्काळातून बाहेर पडू शकतो, असे रोहित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका -
दाओसला ज्या कंपनीत काल करार केले, त्या सगळ्या कंपन्याचे ऑफिस मुंबईत आहेत. मग इथे करार का केला नाही? दाओस ला का जावे लागले? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. अदाणी यांना मुख्यमंत्री दावोसमध्ये भेटले, तिकडे भेटायचे कारण काय होत? गुजरातला 26 हजार कोटींची तरतूद येते, महाराष्ट्रामध्ये का येत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रावर वरून दबाव होता, जर महाराष्ट्रामध्ये उद्योग आले तर तिकडे काही राहणार नाहीत. मागच्या वर्षी एका कंपनीसोबत 3 कोटींचा करार केला. आणि करार दाखवले की 20 हजार कोटीचे करार करायचा म्हणून करू नका, असे रोहित पवार म्हणाले.
मराठी घाबरत नाही -
केंद्रीय तपास यंत्रणा काम करीत असतात. धाड टाकली म्हणून आम्ही शांत बसलो नाही. मराठी घाबरत नाहीत. माझ्यावर कारवाई करणारे नेते हे मी जे व्यवसाय करतात तेच नेते असतील. आम्ही आधी व्यवसायात आलो मग राजकारणात आलो. चोरीचा पैसा राजकारणात वापरत नाही, तुम्ही व्यवसाय करून चोरीचा पैसा राजकारणात वापरतात, असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला.
भाजपवर हल्लाबोल -
भाजपकडे नेते नाहीत. जेव्हा शिंदे आणि अजित पवार मित्रमंडळींना मंत्रिपद मिळाले. भाजपकडे नेते नाहीत त्यामुळे बाकीच्या पक्षातील लोकांना भाजप घेते. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न -
अजित पवारांचा व्हिडीओ पाहून वाईट वाटलं. रुबाब आहे पण तो रूबाब सोडू नये. भाजप त्यांची ताकद कमी करायचा प्रयत्न करत आहे असे तो व्हिडीओ बघून वाटतं, असे रोहित पवार म्हणाले.
भाजपला लोकनेते आवडत नाही.भाजपने अनेक लोकांची ताकद कमी केली, त्यांच्याच नेत्यांची ताकद कमी केली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल लिहून ठेवा, असे रोहित पवार म्हणाले.
आमच्या बाजूने निकाल लागेल -
राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्चर्यकारक निकाल लागेल. लोकांच्या मनात आहे तो निकाल लागेल. ज्याअर्थी भाजप नेते म्हणतात अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागेल, लिहून ठेवा त्याअर्थी तसा निकाल लागणार नाही, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.