नक्षली कनेक्शन : सुधा भारद्वाज यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) आणि दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नक्षलवादी बनवण्याचा डाव असल्याचा युक्तिवाद पुणे पोलिसांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला.
पुणे : नक्षलवादी संबंध प्रकरणी अरुण फरेरा, वर्नन गोन्साल्विस यांच्यानंतर सुधा भारद्वाज यांनाही पुणे न्यायालयानं 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली काल वर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा यांना अटक करण्यात आली होती. आज सुधा भारद्वाज यांनाही अटक करण्यात आली.
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) आणि दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नक्षलवादी बनवण्याचा डाव असल्याचा युक्तिवाद पुणे पोलिसांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला. न्यायालयात युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी काही गंभीर आक्षेप घेतले. विद्यार्थ्यांना माओवादी चळवळीत भरती केल्याचा, ट्रेनिंगसाठी जंगलात पाठवल्याचा, नक्षलवादी चळवळीला पैसे पुरल्याचा युक्तिवादही वकिलांनी केला.
काल नजरकैद संपल्यानंतर तिघांनी अटक टाळण्यासाठी सात दिवसांची नजरकैद वाढवण्याबाबत पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद
- सुधा भारद्वाज यांनी जेएनयू आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थांमधील विद्यार्थ्यांना माओवादी चळवळीत भरती केलं. - पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्रातून या विद्यार्थ्यांची भरती करण्यात आली आणि त्यांना गुरील्ला ट्रेनिंग देण्यासाठी जंगलात पाठवलं. - सुधा भारद्वाज या आयएपीएल या संघटनेच्या प्रमुख आहेत. ही संघटना सीपीआय ( माओईस्ट) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेची पुढची संघटना म्हणून काम करते. - भारद्वाज यांनी या दोन्ही संघटनांच्या एकत्रित परिषदा घेतल्या आणि त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी स्वीकारला. - सुधा भारद्वाज या हाऊस अरेस्टमधे असताना काही इलेक्ट्रॉनिक डीव्हायसेस पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांचा तपास करण्यासाठी सुधा भारद्वाज यांची पोलीस कोठडी गरजेची आहे.
तर दुसरीकडे सुधा भारद्वाज यांच्या वकिलाने काही मागण्या केल्या आहेत
- सुधा भारद्वाज यांना पोलीस कोठडीमधे बेड आणि खुर्ची देण्यात यावी, स्वच्छ कपडे द्यावेत. - सुधा भारद्वाज यांना डायबेटीसची औषधं घेण्याची मुभा मिळावी. तसेच सुधा भारद्वाज यांना डायबेटीस असल्याने त्यांना ठराविक अंतराने जेवणं मिळावं. - त्यांच्या चौकशीवेळी त्यांच्या वकिलांना हजर राहण्याची परवानगी मिळावी. - चौकशी करतेवेळी फक्त पुरुष पोलीस अधिकारी उपस्थित नसावेत, तर महिला अधिकारी देखील तेथे उपस्थित असावे. -विजय मल्ल्याला भारताकडे सुपूर्द करण्यासाठी ज्या प्रकारची स्वच्छ टोयलेट्स त्याला पुरवली जातील असं लंडनच्या कोर्टात सांगण्यात आलं तशाच प्रकारची स्वच्छ टोयलेटस पुरवण्यात यावीत.
काय आहे प्रकरण?
पुण्यात 31 डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा प्रकरणाशी संबंध जोडत महाराष्ट्र पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. 28 ऑगस्ट रोजी या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि नजरकैदेत ठेवण्यात आले.
मजदूर संघाच्या नेत्या सुधा भारद्वाज, तेलुगू कवी वरवर राव, मानवाधिकार कार्यकर्ते अरुण फरेरा, वर्नोन गोंजाल्विस, गौतम नवलखा यांच्यावर नजरकैदेत होती. त्यापैकी गौतम नवलखा यांच्या सुटकेचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले, तर अरुण फरेरा, वर्नोन गोंजाल्विस यांना अटक झाली.
संबंधित बातम्या