Pune bypoll Election : अजित पवारांनी मुलाखती घेण्याआधीच नाना काटेंनी नामनिर्देश पत्र विकत घेतल्याने चर्चेला उधाण
विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी अद्याप चिंचवड विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याआधीच राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी अर्ज विकत घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे.
Pune bypoll Election : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) उमेदवारी जाहीर करण्याआधीच नाना काटे (Nana Kate) यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतलं आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी अद्याप चिंचवड विधानसभेतील (Chinchwad Bypoll Election) इच्छुकांच्या मुलाखती घेण्याआधीच राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी अर्ज विकत घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. नाना काटे यांनी 2014मध्ये चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 42 हजार 553 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला होता. शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडण्यात आला होता. चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू होती. त्यात नाना काटे यांचंदेखील नाव होतं. मात्र राष्ट्रवादीची पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याआधीच नाना काटे अर्ज विकत घेतला आहे.