अवघ्या 500 रुपयांसाठी हत्या; मृतदेहाच्या शर्ट आणि पॅन्टवरील टेलरच्या टॅगवरून हत्येचा छडा
पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसांपूवर्वी बेवारस मृतदेह सापडला होता. हत्येचं प्रकरण होतं, मात्र पोलिसांना काहीच पुरावा मिळत नव्हता. अखेर मृतदेहाच्या शर्ट आणि पॅन्टवरील टेलरच्या टॅगवरून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये रक्ताने माखलेला एक बेवारस मृतदेह आढळला. बघताच क्षणी ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून खिशातील सर्व वस्तू घेऊन हल्लेखोर पसार झाले होते. अशात पोलिसांच्या नजरेस मृतदेहाच्या शर्ट आणि पॅन्टवरील 'प्रिन्स टेलर्स बीडब्ल्यूडी' नावाचं टॅग आढळलं. या टॅगच्या आधारेच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा- 5 ने हत्येचा छडा लावला. धक्कादायक बाब म्हणजे हैदराबाद येथून मुंबईला डॉन बनायला निघालेल्या तीन अल्पवयीन मुलांनी केवळ 500 रुपयांसाठी ही हत्या केल्याचं उघड झालं.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या देहूरोडमधील रेल्वेच्या उड्डाणपुलावर 8 जूनला रक्ताने माखलेला एक बेवारस मृतदेह आढळला. देहूरोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं. तेव्हा मयताच्या खिशातील रोकड, मोबाईल आणि ओळख पटू नये म्हणून सर्व कागदपत्र घेऊन हल्लेखोर पसार झाले होते. मृतदेहाची अवस्था आणि चोरलेल्या वस्तू पाहता ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं होतं. मग पोलीस कर्मचारी भरत माने यांच्या नजरेस मृतदेहाच्या पॅन्ट आणि शर्टवर ही प्रिन्स टेलर्स बीडब्ल्यूडी नावाचं टॅग पडलं. याच टॅगवरून तपासाची चक्र फिरली. जस्ट डाईल वरून प्रिन्स टेलर्सशी संपर्क साधणं सुरू झालं. पण बीडब्ल्यूडीवर घोडं अडलं होतं. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी गूगलचा आधार घेतला. गूगलने बीडब्ल्यूडी म्हणजे मुंबईतील भिवंडी असल्याची माहिती दिली. गुन्हे शाखा- 5 चे एक पथक भिवंडीला रवाना झालं. त्या टेलरच्या मदतीने पोलीस कुटुंबियांपर्यंत पोहचले. मग बेवारस मयत हे 41 वर्षीय दत्तात्रय मार्चला यांचं असल्याचं निष्पन्न झालं. त्यांचा मोबाईल नंबरही हाती लागला. या पहिल्या यशानंतर आता पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोर्चा आरोपींच्या शोधाकडे वळला.
कोणताही गुन्हा असो गुन्हेगार एक अशी चूक करतो जी त्यांना पोलिसांच्या जाळ्यात फसवतेच. अगदी तसेच याप्रकरणात ही घडलं. अज्ञात हल्लेखोरांकडचे पैसे संपले होते. कुटुंबियांकडून पैसे मागवण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीला विनवणी केली आणि त्याच्या पेटीएमवर पैसे मागवण्याचं ठरलं. यासाठी मयताच्या फोनवरुन एक आरोपीने हैदराबाद येथील त्याच्या वडिलांशी संवाद साधला आणि एका अनोळखी व्यक्तीच्या पेटीएमवर वडिलांनी पैसे टाकायला लावले. नंतर मात्र मयताचा फोन स्विच ऑफ करून फेकून दिला. त्यामुळे आरोपींना ट्रेस करणं कठीण झालं होतं. पण आरोपीने वडिलांना केलेल्या कॉलवरून पोलिसांनी सूत्र हलवलं. मग गुन्हे शाखा-5 चं पथक हैदराबादला रवाना झालं. तेव्हा तीन आरोपी असून ते अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं. मग त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आरोपींच्या वडिलांना विश्वासात घेण्यात आलं. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोबाईल तुमच्या मुलाकडे आहे, त्यात महत्त्वाची माहिती असल्याने तो मिळवणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही पुण्यातून आपल्याकडे आलो आहेत. पोलिसांनी रचलेला बनाव पथ्यावर पडला आणि आरोपीचे वडील पोलिसांसोबत पुण्यात पोहचले. मुलाच्या फोनची वाट पाहणं सुरू झालं आणि अपेक्षेप्रमाणे 13 जूनला त्याने वडिलांना फोन केला. तेव्हा त्यांनी उरळी कांचन येथील उसाच्या गुराळात कामाला लागल्याचं सांगितलं. मग पोलिसांनी तिथं जाऊन तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. त्यानंतर हत्येचं घटनाक्रम आणि कारण समोर आलं जे धक्कादायक होतं.
लॉकडाऊनमुळे सोलापुरात अडकलेले दत्तात्रय कुटुंबियांच्या काळजीपोटी भिवंडीला पायी निघाले होते. 7 जूनच्या रात्री ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील पुलाखाली जेवण करायला बसले. तेव्हा हैदराबाद येथून मुंबईत डॉन बनायला निघालेले हे तिघे इथे पोहचले. तिघांना पाहून दत्तात्रय यांनी कुठं निघालेत अशी आपुलकीने विचारणा केली. त्यापैकी एक मुंबईतल्या भिवंडीत जाऊन आल्याने, तिकडेच निघाल्याच सांगितलं. मी ही तिकडेच जाणार आहे, आपण सोबत जाऊ असं दत्तात्रय त्यांना म्हणाले. मग भुखेल्या तिघांनी दत्तात्रय यांच्याकडे 500 रुपयांची मागणी केली. पण दत्तात्रय यांनी नकार दिला आणि त्यांच्यासमोरच वरच्या खिशातील 500 रुपये चोर कप्प्यात ठेवले. हे पाहून चोऱ्या-माऱ्या करणाऱ्या या तिघांना राग आला आणि त्यांनी हत्येचा कट रचला. दत्तात्रय यांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून पुढचा प्रवास सुरु केला. रात्र खूप झाल्याने देहूरोड येथील रेल्वे उड्डाणपुलावर झोपी गेले. तिथेच या तिघांनी दत्तात्रय यांच्या डोक्यात दगड घातला आणि खिशातील पाचशे रुपये, मोबाईल आणि ओळख पटू नये म्हणून सर्व कागदपत्रे घेऊन पसार झाले. या तिघांनी हैदराबाद येथून सुरू केलेल्या प्रवासात आणखी दोघांना लुटले होते. हैदराबाद आणि मुंबई येथील बालसुधारगृहात ही तिकडी जमली. याआधी ही त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती गुन्हे शाखा पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली.
इतर बातम्या