Ram Mandir : 22 जानेवारीला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय - राज ठाकरे
Raj Thackeray On Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये राम लल्लाच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापणाचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे.
Raj Thackeray On Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये राम लल्लाच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापणाचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. त्यादिवशी कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतेय. कुणालाही त्रास न देता गावागावात आरती, पूजा करा, असे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. ते पुण्यात मनसेच्या मेळाव्यात बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात आज मनसेचा मेळावा पार पडला. पुण्यातील गणेश कला मंदिरात होणाऱ्या या मेळाव्यास मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील,नितीन सरदेसाई,अनिल शिदोरे,बाबू वागसकर,शिरीष सावंत हे नेते उपस्थित होते. या मेळाव्यास मनसेच्या महाराष्ट्रातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह जिल्हा अध्यक्ष आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधन केले. त्यावेळी त्यांनी गावात चांगलं वातावरण करा. मत न देणाऱ्यांचा सूड घेऊ नका... यासारखे सल्ले दिले.
शहरातील तरुण विदेशात जातोय, कारण काय?
गाव स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही तर इच्छाशक्ती लागते. अनेक गाव फिरलो, तिथं स्वच्छतेची दूरावस्था दिसली. गावातील तरुण शहरात येतो अन् शहरातील तरुण विदेशात जातो. असं का होते. कारण सभोवतालचं वातावरण चांगलं मिळत नाही. जगावं असं वातावरण मिळत नाही. विदेशात जाऊन प्रत्येकाला चांगली नोकरी मिळते असं नाही. गावातील चांगलं वातावरण तयार करणं, हे पहिलं ध्येय असायलं हवं. त्यासाठी नव्या कल्पना सुचायला हव्यात.
गावातील वातावरण चांगलं करा, मत न देणाऱ्यांचा सूड घेऊ नका -
तुमचं गाव, तुम्ही चांगलं, स्वच्छ ठेवा. गावातील वातावरण बदला, चांगलं करा.. गावातील माता भगिणींना गावात राहावं असं वाटलं पाहिजे. मतदान केले नाही तरीही गावातील वातावरण चांगलं करा. तुम्हाला मतं पडतील, असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंना दिला. ज्यांनी मतं दिली नाहीत, त्यांचा सूड घेऊ नका, गाव स्वच्छ करा... मत दिले नाही त्यालाही तुम्हाला मत द्यावं वाटलं पाहिजे, असाही सल्ला राज ठाकरेंनी दिला. गावात असं काम करा की गावातील आधीच्या पिढीला हेवा वाटेल, असे राज ठाकरे म्हणाले.
स्वच्छ ग्रामपंचायतीला पाच लाखांची देणगी -
गावातील नागरिकांची बैठक बोलवा, गाव स्वच्छ कसं ठेवायचं याबाबत स्वच्छ करा. मनसेच्या हातात असलेल्या सर्वात जास्त स्वच्छ असणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयांचा निधी देईल. ही रक्कम कमी वाटत असेल तर जास्त देईल, असेही राज ठाकरे म्हणाले.
22 जानेवारीला कारसेवकांसाठी कार्यक्रम घ्या -
22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. राम मंदिर होणार आहे, त्यापेक्षा महत्वाचं ज्या कारसेवकांनी कष्ट घेतलं, स्वप्न पाहिलं, ते 22 तारखेला पूर्ण होतेय. त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला चांगलं करता येईल.. लोकांना त्रास न देता जे काही करता येईल ते करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.